(जैतापूर / राजन लाड)
राजापूर तालुक्यातील सागरी महामार्गावर वारंवार घडणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी नाटे सागरी पोलीस ठाण्याने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. महामार्गावरील धोकादायक वळणे, तीव्र उतार आणि अपघातप्रवण ठिकाणी वाहनचालकांना सावध करण्यासाठी रेडियम पट्टे, दिशादर्शक फलक आणि इतर सुरक्षाविषयक उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत.
नाटे सागरी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील कशेळी, आडिवरे, धारतळे आणि नाटे परिसरातील सागरी महामार्गावर अनेक ठिकाणी तीव्र वळणे, चढ-उतार तसेच कमी दृश्यमानता असलेले रस्ते आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि पावसाळ्यात वाहनचालकांना या ठिकाणांचा अचूक अंदाज न आल्याने अपघातांचा धोका वाढत असल्याचे निदर्शनास आले होते.
या पार्श्वभूमीवर नाटे सागरी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेत अनेक धोकादायक वळणांवर आणि अपघातप्रवण ठिकाणी रेडियम पट्टे बसविले आहेत. वाहनांच्या हेडलाईटच्या प्रकाशात हे पट्टे दूरवरून स्पष्टपणे दिसत असल्याने चालकांना वळणांचा अंदाज घेणे अधिक सुलभ झाले आहे.
याशिवाय कशेळी आणि आडिवरे परिसरातील काही संवेदनशील ठिकाणी प्लास्टिक ड्रमवर रेडियम लावून प्रभावी दिशादर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे अंधारात किंवा खराब हवामानातही वाहनचालकांना रस्त्याची दिशा सहजपणे समजू शकते.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्वी उभारलेले अनेक दिशादर्शक फलक धूळ, माती आणि झाडाझुडपांमुळे अस्पष्ट झाले होते. नाटे सागरी पोलिसांनी या फलकांची साफसफाई करून ते पुन्हा स्पष्ट दिसतील यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना महत्त्वाच्या सूचना आणि मार्गदर्शन सहज उपलब्ध होत आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, विभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम, अभिजीत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही मोहीम यशस्वीपणे राबविली.
रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती करण्याबरोबरच प्रत्यक्ष उपाययोजना करून अपघात टाळण्याचा प्रयत्न केल्याबद्दल स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे. वाढती वाहतूक आणि पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर अशा उपाययोजना काळाची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
सागरी महामार्ग अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने पोलिसांनी उचललेले हे पाऊल महत्त्वाचे मानले जात असून, या उपक्रमामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास निश्चितच मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

