(राजापूर)
राजापूर तालुक्यातील कोळवणखडी येथे शनिवारी मध्यरात्री दरोडेखोरांच्या टोळक्याने थरार माजवत मोरे कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या देत लुटण्याचा प्रयत्न केला. सुमारे ५ ते ६ दरोडेखोरांनी रात्री दीडच्या सुमारास अंधाराची संधी साधून सदानंद शांताराम मोरे (५५) यांच्या घरात प्रवेश केला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मोरे कुटुंब यामध्ये सदानंद मोरे, पत्नी आणि तीन मुली हे झोपेत असताना घराच्या मागच्या खिडकीतून दरोडेखोर आत घुसले. घरात प्रवेश करताच त्यांनी मौल्यवान वस्तू घरात शोधायला सुरुवात केली. घरात अनोळखी व्यक्तींची चाहूल लागताच मोरे कुटुंब जागे झाले. याच वेळी दरोडेखोरांनी घरातील कोयता हातात घेत त्यांना धमकावत “पैसे द्या, नाही तर जीव गमवाल; पोलिसात गेलात तर संपवून टाकू!” असा दम दिला.
कुटुंब भीतीने थरथरत असताना दरोडेखोरांनी रोख रक्कम व दागिन्यांची मागणी केली. जीव वाचवण्यासाठी मोरे कुटुंबातील मुलींनी घरी डब्यात जमा करून ठेवलेली सुमारे १,६०० रुपयांची रक्कम त्यांना दिली. दरोडेखोरांनी चेहऱ्यावर कानटोपी घातल्याने त्यांची ओळख पटवणे कठीण होते.
दरम्यान, मोरे कुटुंबातील आरडाओरड ऐकून गावकरी घराच्या दिशेने येत असल्याचे लक्षात येताच दरोडेखोरांनी घाईघाईने अनुस्कुरा रोड मार्गे गाडीने पळ काढला. गाडीचा नंबर धूसर असल्याने वाहनाची ओळख पटवता आलेली नाही, असे कुटुंबाने सांगितले.
घटनेची तक्रार सदानंद मोरे यांनी रात्री २ वाजता रायपाटण पोलीस दूरक्षेत्रात नोंदवली. राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे तपास करीत आहेत. चोरीच्या उद्देशानेच हा दरोडा टाकण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. नेमका किती मुद्देमाल गेला याबाबत मात्र अद्याप स्पष्टता नाही.
काही दिवसांपूर्वी रायपाटण पोलिस हद्दीत वृद्ध महिलेची निर्घृण हत्या झाली होती. त्या प्रकरणातील आरोपी अद्यापही फरारी असताना दुसऱ्या दरोड्याची घटना घडल्याने नागरिकांत भीती व संताप वाढला आहे.
“राजापूर तालुका दरोडेखोरांसाठी सुरक्षित आश्रयस्थान तर बनत नाहीये ना?” असा संतप्त प्रश्न नागरिक उपस्थित करत असून पोलिसांनी तातडीने कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

