(जैतापूर / राजन लाड)
कोकणातील गणेशोत्सवाची पारंपरिक आणि भक्तिमय परंपरा जपत ‘जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’चा २७ वा गणेशोत्सव यंदाही उत्साहात, शिस्तबद्ध आणि सामाजिक भान जपत संपन्न झाला. डीजे, फटाके आणि गुलालाची उधळण टाळत पारंपरिक नृत्यांच्या गजरात काढण्यात आलेली विसर्जन मिरवणूक यंदाच्या उत्सवाचे विशेष आकर्षण ठरली. महिलांचे लेझीम पथक आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाट येथील कलाकारांनी सादर केलेले १० फुटी कोंबडा नृत्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
ग्रामीण भागात असूनही तब्बल २६ वर्षांची सामाजिक व सांस्कृतिक परंपरा जपणाऱ्या या मंडळाचा २७ वा गणेशोत्सव विविध सांस्कृतिक आणि समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला. उत्सवाच्या कालावधीत राजापूर तालुक्यासह रत्नागिरी जिल्हा आणि पंचक्रोशीतील अनेक मान्यवरांनी मंडळाला सदिच्छा भेटी दिल्या. मंडळाचे अध्यक्ष गिरीश करगुटकर, सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मान्यवरांचे आदरपूर्वक स्वागत केले.
शनिवार, २६ सप्टेंबर २०२६ रोजी अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी उत्सवाची सांगता करण्यात आली. विसर्जनापूर्वी मंडपात प्रसिद्ध वकील तथा राजापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष ॲड. शशिकांत सुतार यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण आणि सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. त्यांच्या हस्ते मंडळाच्या लॉटरी योजनेतील मुख्य विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. तसेच वर्षभर उत्सवासाठी मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी ‘पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक संस्था, मिठगावणे’च्या पदाधिकाऱ्यांना विशेष निमंत्रित करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
सायंकाळी ५ वाजता जैतापूर एसटी स्टँड येथून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. कर्णकर्कश डीजे, फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची अनावश्यक उधळण टाळून मंडळाने पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीला प्राधान्य दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाट येथून आलेल्या दोन कलाकारांनी सादर केलेले १० फुटी कोंबडा नृत्य मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले. शिवणे येथील बेंजो पथकानेही आपल्या सादरीकरणाने वातावरणात रंगत आणली. तर तुळसुंदे उगवती वाडी येथील कष्टकरी महिला आणि मुलींनी सादर केलेल्या शिस्तबद्ध लेझीम नृत्याने उपस्थितांची दाद मिळवली.
वेळेचे काटेकोर नियोजन आणि प्रदूषणमुक्त वातावरणात मिरवणूक जैतापूर बंदर धक्क्यावर पोहोचली. त्यानंतर रात्री ८ वाजता होडीद्वारे मूर्ती खोल खाडीत नेण्यात आली आणि भावपूर्ण वातावरणात ‘जैतापूरच्या राजा’चे विसर्जन करण्यात आले.
विसर्जन सोहळ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सागरी पोलीस ठाणे नाटेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ आणि त्यांच्या पथकाने चोख बंदोबस्त ठेवला. लांजा उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) सुरेश कदम यांनीही महोत्सवाला प्रत्यक्ष भेट देऊन शांततापूर्ण वातावरण आणि चोख नियोजनाचे कौतुक केले.
उत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल मंडळाचे अध्यक्ष गिरीश करगुटकर, सचिव राकेश दांडेकर, उपाध्यक्ष श्रीकृष्ण राऊत, खजिनदार सुनील करगुटकर तसेच सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासन, ग्रामस्थ, महिला भगिनी, कलाकार आणि गणेशभक्तांचे आभार मानले. जात, पात आणि पंथ बाजूला ठेवून देवभक्तीच्या माध्यमातून सामाजिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या ‘जैतापूरचा राजा’ मंडळाने यंदाचा गणेशोत्सवही शिस्तबद्ध आणि आदर्श पद्धतीने पूर्ण केला.


