(राजापूर /रत्नागिरी)
घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने मागील दरवाजाची कडी आणि दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. बेडरूममधील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना राजापूर तालुक्यातील ओणी-कोंडीवळे येथील गोतावडेवाडी परिसरात घडली. या घरफोडीत एकूण १ लाख ८ हजार ७६५ रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले असून, याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शामसुंदर गजानन शेट्ये (वय ३४, रा. ओणी-कोंडीवळे, गोतावडेवाडी, ता. राजापूर) यांच्या घरी २० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५.४५ ते रात्री ९.४५ या कालावधीत ही चोरी झाली. घरात कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने मागील दरवाजाची कडी तोडली. त्यानंतर दरवाजा तोडून घरात प्रवेश केला आणि बेडरूममधील कपाटात ठेवलेले दागिने चोरून नेले.
चोरीस गेलेल्या ऐवजात १२.८५ ग्रॅम वजनाचे, ८७ हजार ७६५ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, तसेच २१ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने यांचा समावेश आहे. घरातील दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर शेट्ये यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५(अ), ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. चोरट्याचा शोध घेण्यासाठी राजापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.


