(राजापूर / तुषार पाचलकर)
कोकण कला व शिक्षण विकास संस्था, मुंबई (महाराष्ट्र) यांच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या “आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार” साठी यंदा ग्रामपंचायत कळसवली (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) यांची निवड करण्यात आली आहे. या मानाच्या सन्मानामुळे गावाचा आणि ग्रामस्थांचा अभिमान दुप्पट झाला आहे.
या पुरस्कारासाठी कळसवली ग्रामपंचायतीने विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट कार्याचा आदर्श नमुना सादर केला होता. स्वच्छता अभियान, जलव्यवस्थापन, महिला सबलीकरण, शिक्षण, हरित उपक्रम आणि डिजिटल ग्रामपंचायत या क्षेत्रांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल या ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आला.
पुरस्कार वितरण समारंभात कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष श्री. दयानंद कुबल, प्रमुख अतिथी पद्मश्री श्री. मुरलीकांत पेटकर (चंदू चॅम्पियन), अभिनेता-लेखक-दिग्दर्शक श्री. श्रीनिवास नार्वेकर, सुप्रसिद्ध अभिनेते श्री. अविनाश नारकर, तसेच अनेक सोशल मीडिया रील स्टार्स उपस्थित होते.
या प्रसंगी सरपंच श्री. देवेश गोविंद तळेकर, ग्रामपंचायत अधिकारी सौ. सोनाली सतिश आराख आणि उपसरपंच श्री. जयवंत अर्जुन शेडेकर यांनी पुरस्कार स्वीकारला. सरपंच तळेकर म्हणाले, “हा सन्मान संपूर्ण ग्रामस्थांचा आहे. त्यांच्या सहभाग आणि सहकार्याशिवाय हे शक्य झाले नसते.”
विशेष म्हणजे, या यशामध्ये कळसवली ग्रामपंचायत अधिकारी सौ. सोनाली मॅडम यांचे मार्गदर्शन आणि परिश्रम यांचा मोलाचा वाटा असून, त्यांच्या नेतृत्वामुळेच कळसवली ग्रामपंचायत ‘आदर्श ग्रामपंचायत’ म्हणून राज्यात नावारूपास आली आहे.

