(राजापूर / तुषार पाचलकर)
पाचलहून रत्नागिरीकडे जाणारी रत्नागिरी–आजिवली मार्गावरील एस.टी. बस आज सकाळी सौन्दळ रेल्वे स्टेशनजवळ (पाटील वाडी बस स्टॉप) अपघातग्रस्त झाली. सकाळी ८:१० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दुधाने भरलेला आयशर ट्रक (MH09 J 3880) हा ओणीहून पाचलच्या दिशेने भरधाव वेगाने जात असताना, चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे त्याने समोरून येणाऱ्या एस.टी. बसला जोरदार धडक दिली. या बसमध्ये अंदाजे ३० ते ३५ प्रवासी प्रवास करत होते.
धडकेनंतर बसमध्ये प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. मात्र, मोठी हानी टळल्यामुळे सगळे प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळते. आयशर ट्रकचा चालक आणि क्लिनर यांना जास्त दुखापत झाली असून त्यांना रायपाटण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघातानंतर प्रवाश्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक अतिशय सुसाट वेगात येत होता आणि वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. या घटनेमुळे काही काळ मार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.