(खेड /रत्नागिरी प्रतिनिधी)
तालुक्यातील मुरडे गोठलवाडी येथे बुधवारी २७ मे रोजी सायंकाळी झालेल्या गावठी बॉम्बच्या भीषण स्फोटात १२ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली. अचानक झालेल्या स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जंगल परिसरात शिकारीसाठी ठेवण्यात आलेल्या गावठी स्फोटकामुळे हा प्रकार घडल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
प्रणव सुरेश येसरे (वय १२) असे जखमी मुलाचे नाव असून, स्फोटात तो गंभीररीत्या भाजला व जखमी झाला. घटनेनंतर ग्रामस्थांनी तातडीने त्याला उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्याला सांगली येथे हलविण्यात आल्याची माहिती मिळाली. सायंकाळच्या सुमारास अचानक मोठा आवाज झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराचा पंचनामा करत तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, श्वान पथकाच्या सहाय्याने परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. हा गावठी बॉम्ब नेमका कुणी ठेवला होता आणि त्यामागचा उद्देश काय होता, याचा सखोल तपास पोलिसांकडून केला जात आहे. जंगल परिसरात वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी स्फोटकांचा वापर केला जात असल्याची शक्यता तपास यंत्रणांनी वर्तवली आहे. तसेच गावातील काही नागरिकांची चौकशीही सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेमुळे मुरडे गोठलवाडी परिसरात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. निष्पाप मुलगा या स्फोटाचा बळी ठरल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात असून, अशा धोकादायक स्फोटकांचा वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पुढील तपासानंतरच या धक्कादायक घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
अलिकडच्या काळात ग्रामीण आणि जंगलालगतच्या भागांमध्ये गावठी बॉम्ब ठेवण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. विशेषतः जंगली डुकरांच्या शिकारीसाठी अशा स्फोटकांचा वापर होत असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे. शेतपिकांचे नुकसान टाळण्याच्या नावाखाली काहीजण जीवघेण्या पद्धतींचा अवलंब करत असल्याने निष्पाप नागरिकांसह वन्यजीवांच्याही जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. हे गावठी स्फोटक अनेकदा जंगल परिसर, पायवाटा किंवा शेतांच्या कडेला लपवून ठेवले जातात. अन्नाच्या आमिषाने प्राण्यांना आकर्षित करून स्फोट घडवून आणण्याची पद्धत वापरली जात असल्याचे बोलले जाते. मात्र अशा बेकायदेशीर आणि धोकादायक कृत्यांचा फटका अनेकदा निष्पाप नागरिकांना आता बसत असून, लहान मुले, वयोवृद्ध त्याचे बळी ठरत आहेत.

