(रत्नागिरी / प्रतिनिधी)
हातखंबा येथील भीषण अपघातात ट्रकचालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती १९ एप्रिल रोजी संध्याकाळी उशिरा समोर आली असून, दुर्घटनेचे स्वरूप किती भयावह होते, याचे अंगावर शहारे आणणारे चित्र उघड झाले आहे. विशाल गोकुळ माने (वय २५, रा. धाराशिव) असे मृत ट्रकचालकाचे नाव आहे, लोखंडी सळ्यांच्या ढिगाऱ्यात अडकून त्यांचा जागीच अंत झाल्याचे बोलले जात आहे.
या अपघातावेळी ट्रकने सलग वाहनांना धडक दिल्यानंतर नियंत्रण सुटून सुमारे पंधरा फूट खोल दरीमध्ये असलेल्या विहिरीत पडला. या वेळी ट्रकमधील लोखंडी सळ्या थेट केबिनमध्ये घुसल्याने केबिनचा अक्षरशः चक्काचूर झाला होता. केबिनचे तुकडे विखुरले जाऊन काही भाग थेट विहिरीत कोसळले होते, तर सळ्या ट्रकमधून लोंबकळत असल्याने अपघाताचे दृश्य अत्यंत भीषण बनले होते.
अपघातानंतर ट्रकचा क्लिनर जखमी अवस्थेत बाहेर काढून त्याच्यासह एकूण तिघांना जखमी अवस्थेत उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र चालकाचा काहीच ठावठिकाणा लागत नसल्याने घटनास्थळी तर्कवितर्क काढले जात होते. अखेर क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त ट्रक बाहेर काढल्यानंतर चालकाचा मृतदेह आढळून आला. सळ्यांच्या तीव्र धडकेत आणि केबिनच्या चुराड्यात चालकाचा जागीच मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.
या अपघाताने महामार्गावरील सुरक्षेच्या प्रश्नांना पुन्हा एकदा अधोरेखित केले असून, अशा प्रकारच्या भीषण दुर्घटनांमुळे प्रशासन आणि संबंधित यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महामार्गाचे काम सुरू असलेल्या हातखंबा गाव परिसरात सुरक्षेच्या उपाययोजनांचा पूर्णतः अभाव असल्याचे चित्र समोर येत आहे. रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी आवश्यक असलेले इशारे, रेडियम चिन्हे, डायव्हर्जन फलक, प्रकाशयोजना किंवा सुरक्षित मार्गदर्शन यापैकी कोणतीही मूलभूत व्यवस्था योग्य पद्धतीने करण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट दिसते. परिणामी, वाहनचालक अक्षरशः अंदाजावर वाहन चालवत असून, प्रत्येक क्षणी अपघाताचा धोका वाढत आहे. ठेकेदार कंपनीकडून हा उघडपणे निष्काळजी आणि मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे.
कामाच्या ठिकाणी सुरक्षेचे नियम पाळणे ही केवळ कागदोपत्री बाब न राहता प्रत्यक्षात अंमलात आणणे आवश्यक असताना, संबंधित कंपनीकडून त्याकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे. हे दुर्लक्ष केवळ बेफिकिरी नसून नागरिकांच्या जीवाशी खेळ करण्यासारखेच आहे, अशी तीव्र भावना व्यक्त होत आहे.

