(रत्नागिरी / मिलिंद बनप)
रत्नागिरी तालुकास्तरीय आंतरशालेय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा नुकत्याच गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडल्या. मात्र, या स्पर्धांच्या आयोजनाचा दर्जा आणि सामन्यांची रचना पाहता रत्नागिरीतील शालेय क्रिकेटपटूंच्या गुणवत्तेला योग्य संधी मिळत आहे का, हा प्रश्न उपस्थित होतो. गावातील क्रिकेट क्लबकडून आयोजित होणाऱ्या टेनिस क्रिकेट स्पर्धांपेक्षाही या स्पर्धांचे आयोजन सुमार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
स्पर्धा एक-दोन दिवसांत आटोपण्यासाठी केवळ पाच षटकांचे झटपट सामने आयोजित केले जातात. लेदर बॉल क्रिकेटमध्ये फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील कौशल्य सिद्ध करण्यासाठी आवश्यक वेळच खेळाडूंना मिळत नसेल, तर त्यांच्या प्रत्यक्ष क्षमतेचे मूल्यमापन कसे होणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. शालेय क्रीडा विभागाने किमान २० षटकांचे सामने आयोजित करून विद्यार्थ्यांना आपला खेळ आणि गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी देणे आवश्यक आहे.
यासाठी शासनाकडूनही अशा स्पर्धांना आवश्यक ते पाठबळ देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर रत्नागिरीत लेदर बॉल क्रिकेटसाठी आवश्यक दर्जाचे मैदान उपलब्ध नसणे ही आणखी एक मोठी अडचण आहे. रत्नागिरीतील प्रमुख क्रिकेट मैदान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याने शालेय क्रिकेटपटूंसमोर मैदानाची समस्या कायम आहे. परिणामी, तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धाही गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या मैदानावर घ्याव्या लागल्या.
या स्पर्धेदरम्यान वापरण्यात आलेली खेळपट्टीवरील मॅटही खराब अवस्थेत असल्याचे दिसून आले. सामन्यावेळी स्कोअरबोर्डची व्यवस्था नव्हती. त्यामुळे प्रत्येक षटकानंतरचा स्कोअर मैदानावरील खेळाडूंना समजणे कठीण झाले. माईक आणि साध्या स्पीकरचीही व्यवस्था नसल्याने प्रत्येक षटकानंतर स्कोअर जाहीर करणे शक्य झाले नाही. स्पर्धेचे आयोजन केवळ सामने उरकून संबंधित क्रीडा अधिकाऱ्यांना निकाल कळविण्यापुरते मर्यादित राहू नये, अशी अपेक्षा आहे.
मुंबईतील हॅरिस शिल्डसह विविध शालेय क्रिकेट स्पर्धांमधून अनेक युवा खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळते. त्याच धर्तीवर रत्नागिरीतही शालेय क्रिकेटपटूंसाठी किमान २० षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धांचे आयोजन होणे आवश्यक आहे. रत्नागिरी क्रिकेट असोसिएशनची धुरा एका खंबीर नेतृत्वाकडे असतानाही अशा शालेय स्पर्धांना प्रोत्साहन देण्यासाठी अधिक प्रयत्न का होत नाहीत, हा प्रश्नही उपस्थित होत आहे.
पूर्वी सीडीसीएचे सचिव दीपक देसाई यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने शालेय क्रिकेट स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले होते. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचे मैदान २६ जानेवारीपर्यंत तयार झाले, तर अशा प्रकारची स्पर्धा नक्की आयोजित करू, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले आहे.
रत्नागिरी शहरातील विविध क्रिकेट प्रशिक्षण अकॅडमींमध्ये सुमारे ३०० शालेय क्रिकेटपटू प्रशिक्षण घेत आहेत. नेटमध्ये नियमित सराव करून फलंदाजी आणि गोलंदाजीचे कौशल्य विकसित करणाऱ्या या खेळाडूंना प्रत्यक्ष स्पर्धेत आपली गुणवत्ता आजमावण्याची संधी मिळणे तितकेच महत्त्वाचे आहे. मात्र, चांगल्या आणि स्पर्धात्मक क्रिकेट स्पर्धांच्या अभावामुळे हे खेळाडू अशा संधीच्या प्रतीक्षेत आहेत.
दरम्यान, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडलेली अंडर-१७ क्रिकेट स्पर्धा जवळून पाहिल्यानंतर रत्नागिरीतील शालेय क्रिकेटपटूंच्या भवितव्याच्या दृष्टीने तालुकास्तरीय स्पर्धांचे स्वरूप अधिक दर्जेदार करण्याची गरज प्रकर्षाने जाणवते. केवळ स्पर्धा आयोजित करून ती पूर्ण करणे हा उद्देश न राहता, त्यातून खेळाडूंच्या कौशल्याला व्यासपीठ मिळाले पाहिजे.
रत्नागिरीतील समविचारी क्रिकेटप्रेमींनी एकत्र येऊन अंडर-१४ आणि अंडर-१६ गटांसाठी दर्जेदार लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, ही अपेक्षा आहे. अशा स्पर्धांमुळे शालेय क्रिकेटपटूंना सातत्याने स्पर्धात्मक वातावरण मिळेल आणि त्यातून रत्नागिरीतील क्रिकेटला भविष्यात अधिक सक्षम खेळाडू मिळण्यास मदत होईल.


