( गणपतीपुळे / वैभव पवार )
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव होणार आहे. गणेशोत्सवाची विविध ठिकाणी सांगता झाल्यानंतर श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे अंगारकी चतुर्थीचा योग जुळून आल्याने घाटमाथ्यासह विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक दाखल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर यात्रोत्सवाचे नियोजन आणि आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी, २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी गणपतीपुळे देवस्थान समितीच्या कार्यालयात विविध विभागांची बैठक घेण्यात आली.
या बैठकीत अंगारकी चतुर्थी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित विभागांनी चोख नियोजन करून भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या. यात्रोत्सव सुरळीत, शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्यरत राहण्याचे निर्देशही देण्यात आले.
अंगारकी चतुर्थीनिमित्त स्वयंभू गणपती मंदिर मंगळवारी, २९ सप्टेंबर रोजी पहाटे ३.३० वाजता भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. प्रारंभी गणपती मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांच्या हस्ते स्वयंभू श्रींची पूजाअर्चा, मंत्रपुष्प आणि आरती करण्यात येईल. त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. भाविकांना श्रींचे दर्शन सुलभ आणि शिस्तबद्ध पद्धतीने घेता यावे, यासाठी देवस्थान समितीच्या वतीने मंदिर परिसरात दर्शन रांगांची व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शन रांगेतील भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी देवस्थान समिती कार्यरत राहणार आहे.
मंदिर परिसरासह संपूर्ण गणपतीपुळे परिसरातील भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी गणपतीपुळे ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनही कार्यरत राहणार आहे. अंगारकीच्या निमित्ताने घाटमाथ्यावरील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, कराड, मिरज, कवठेमहांकाळ आदी भागांतून भाविक मोठ्या संख्येने गणपतीपुळे येथे येण्याची शक्यता आहे.
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर परिसर तसेच समुद्र चौपाटीवर कोणताही अनुचित प्रकार किंवा दुर्घटना घडू नये, यासाठी पोलीस प्रशासन, होमगार्ड आणि गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक कार्यरत राहणार आहेत. मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जयगड पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
अंगारकी चतुर्थी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची वाढती गर्दी, वाहतूक व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था, पार्किंग, आरोग्य सुविधा, आपत्कालीन व्यवस्था तसेच अन्य आवश्यक बाबींचा बैठकीत आढावा घेण्यात आला. संबंधित विभागांना त्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या असून यात्रोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या बैठकीला संस्थान श्री देव गणपतीपुळेचे सरपंच निलेश कोल्हटकर, सचिव विनायक राऊत, पंच डॉ. श्रीराम केळकर, अमित मेहेंदळे, जयगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, महावितरण विभागाचे अधिकारी, वाहतूक विभागाचे प्रतिनिधी, गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, परिसरातील हॉटेल चालक-मालक, जीवरक्षक, पोलीस पाटील आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.


