(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील श्री. मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने एनएसएस सप्ताहांतर्गत दत्तक गाव पाचल येथे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी पाचल बाजारपेठेसह विविध परिसरात स्वच्छता मोहीम राबवत नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला.
या उपक्रमाचे उद्घाटन पाचल ग्रामपंचायतीचे सदस्य श्री. विनायक सक्रे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतीस्थळाजवळून स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली. त्यानंतर पाचल बाजारपेठ, आझाद टेकडी परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, ग्रामसचिवालय परिसर तसेच पाचल बस स्थानक परिसरात स्वच्छता करण्यात आली.
या परिसरात मोठ्या प्रमाणात आढळलेला प्लास्टिक व इतर कचरा स्वयंसेवकांनी गोळा करून कचरा गाडीत भरून पाठविला. यावेळी प्लास्टिकच्या बाटल्या वेगळ्या करून त्यांची स्वतंत्र विल्हेवाट लावण्यात आली. विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात कचरा संकलित करत परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला. तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली.
या उपक्रमात पाचल ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री. आत्माराम सुतार, सदस्य श्री. संजय पाथरे, श्री. विनायक सक्रे, दर्शना जाधव, माजी उपसरपंच श्री. किशोर नारकर, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विकास पाटील, प्रा. एस. जी. चव्हाण, प्रा. पी. पी. राठोड, ग्रामपंचायत अधिकारी श्री. संतोष चव्हाण, कर्मचारी श्री. कल्पेश सुतार, श्री. नंदकुमार पांचाळ, श्री. सुभाष काळे आदी सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांनी राबविलेल्या या स्वच्छता मोहिमेचे परिसरातील नागरिक तसेच व्यापारी वर्गातून कौतुक करण्यात आले.
फोटो : खापणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत पाचल बाजारपेठेत ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमाचे उद्घाटन करताना पाचल ग्रामपंचायतचे सदस्य श्री.विनायक सक्रे व उपस्थित मान्यवर


