(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्याच्या तत्कालीन तहसीलदार प्रतिभा वराळे यांची उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती झाली असून, त्यांची सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी (महसूल – जनरल) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रतिभा वराळे यांनी 2017 ते 2021 या कालावधीत राजापूर तालुक्याच्या तहसीलदारपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. त्यानंतर 2021 ते 2024 या कालावधीत त्यांनी गुहागर तहसीलदार म्हणून कार्य केले. कार्यकाळात प्रशासनातील पारदर्शकता, नागरिकाभिमुख निर्णयप्रक्रिया आणि आपत्ती व्यवस्थापनातील तत्परता यासाठी त्यांची विशेष ओळख निर्माण झाली.
2024 साली त्यांची बदली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) येथे झाली, जिथे त्यांनी मेट्रो प्रकल्पासाठी भू-संपादन अधिकारी म्हणून कार्य करत महत्त्वाचे योगदान दिले.
आता उपजिल्हाधिकारी म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात रुजू होताना त्यांच्या कार्यतत्परतेचा अनुभव स्थानिक प्रशासनाला निश्चितच लाभदायी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे..

