(राजापूर / तुषार पाचलकर)
पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, पाचल येथे लिपिक म्हणून कार्यरत असलेले महेंद्र रमेश धामापूरकर यांचे शुक्रवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराने दुःखद निधन झाले. पडवे येथील हॉस्पिटलमधून त्यांना केळवली येथील त्यांच्या घरी आणत असताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
महेंद्र धामापूरकर यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९७७ रोजी झाला. केळवली हे त्यांचे मूळ गाव होते. पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, पाचल येथे ते सन २००८ पासून लिपिक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या सेवाकाळातील जवळपास १० वर्षे अद्याप बाकी होती. सर्वांशी प्रेमाचे आणि आपुलकीचे संबंध असलेले महेंद्र धामापूरकर यांच्या अचानक निधनाने पाचल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाने शाळा तसेच पाचल पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.
शनिवार, १९ सप्टेंबर रोजी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना कुडाळ येथील पडवे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मागील पाच ते सहा वर्षांपासून त्यांच्यावर पॅरालिसीसची उपचारपद्धती सुरू होती. उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृतीत निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीनंतर त्यांचे निधन झाले.
महेंद्र धामापूरकर यांच्या पश्चात वडील, भाऊ, बहीण, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अचानक निधनाने कुटुंबीय, नातेवाईक, सहकारी आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


