(रत्नागिरी)
“पुढील वर्षी जिल्ह्यातील शाळांची पटसंख्या किती वाढेल, गावागावात किती आदर्श शाळा उभ्या राहतील आणि त्यातून आदर्श विद्यार्थी घडवून माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे स्वप्न कसे साकार होईल, याची जबाबदारी प्राथमिक शिक्षकांनी स्वीकारावी,” असे आवाहन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार (२०२५-२६) तसेच आदर्श शाळा पुरस्कार (२०२४-२५ व २०२५-२६) वितरण सोहळा स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, आमदार किरण सामंत, नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके, कृषी व पशुसंवर्धन सभापती महेश नाटेकर, समाजकल्याण सभापती सुयोग कांबळे, महिला व बालविकास सभापती मयुरी शिर्के, शिक्षण व अर्थ सभापती नंदकुमार मुरकर यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी आणि जिल्हाभरातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्याला भारतरत्न महर्षी पांडुरंग वामन काणे आणि साने गुरुजी यांसारख्या महान विभूतींचा वैचारिक वारसा लाभला आहे. साने गुरुजींच्या आईने दिलेला “हृदयाला आणि मनाला मळ लागू देऊ नका” हा संस्कार प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये रुजविण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. केवळ शैक्षणिक ज्ञान न देता विद्यार्थ्यांमध्ये चारित्र्य, संस्कार आणि सामाजिक जाणीव निर्माण करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

ते पुढे म्हणाले की, शिक्षकांनी संघर्षाचा मार्ग न स्वीकारता संवादातून प्रश्न सोडविण्याची भूमिका घ्यावी. ग्रामीण भागातही ‘दामले विद्यालय’सारख्या दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि आदर्श शाळा निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. पुढील वर्षी जिल्ह्यातील किमान ३० हजार विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला बसतील, असे उद्दिष्ट ठेवून शिक्षकांनी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती विकसित करण्यासाठी आणि त्यांना भविष्यातील आव्हानांसाठी सक्षम बनविण्यासाठी शिक्षकांनी अधिक मेहनत घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
‘शिव्यामुक्त’ आणि ‘नशामुक्त’ शाळा अभियानाची गरज
जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांनी आपल्या मनोगतात शिक्षकांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, नियमित शैक्षणिक कामकाजासोबत विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा आणि इतर उपक्रमांसाठी तयार करण्याचे काम शिक्षक अत्यंत समर्पितपणे करत आहेत. जिल्हा परिषदेत कामकाजाची सुरुवात शिक्षकांच्या पदोन्नतीच्या प्रश्नाला प्राधान्य देऊन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले. “जिल्ह्यातील १०० टक्के शाळा ‘निपुण शाळा’ म्हणून घोषित करण्याचे आपले ध्येय आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित, सकारात्मक आणि संस्कारक्षम वातावरण मिळावे यासाठी ‘शिव्यामुक्त शाळा’ आणि ‘नशामुक्त शाळा’ हे अभियान प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे,” असे त्या म्हणाल्या. पटसंख्या घटल्यामुळे एकही शाळा बंद पडणार नाही, यासाठी शिक्षकांनी पालकांशी सातत्याने संवाद साधून शाळांबद्दल विश्वास निर्माण करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमात जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके आणि शिक्षण व अर्थ सभापती नंदकुमार मुरकर यांनीही मनोगत व्यक्त करून पुरस्कारप्राप्त शिक्षक आणि शाळांचे अभिनंदन केले. त्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि ग्रामीण भागातील शाळांचे बळकटीकरण यासाठी सर्व शिक्षकांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.
या सोहळ्यात सन २०२५-२६ मधील आदर्श शिक्षक तसेच सन २०२४-२५ आणि २०२५-२६ मधील आदर्श शाळांचा गौरव करण्यात आला. पुरस्कारप्राप्त शिक्षक आणि शाळांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करत त्यांच्या कार्याचा गौरव केला.

