(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १० मधील दोन अपक्ष उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे अवैध ठरवण्याच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशाला जिल्हा न्यायालयानेही दुजोरा दिला आहे. मंगळवारी (दि. २५) झालेल्या सुनावणीत न्यायालयाने दोन्ही उमेदवारांचे अपील नामंजूर करतावर प्राथमिक निर्णय कायम ठेवला.
प्रभाग १० मधून संपदा रसाळ-राणा आणि सचिन सदानंद शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, अर्जासोबतचे प्रतिज्ञापत्र विधिवत नोटरी न केल्याने प्रांताधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी दोन्ही उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे अवैध ठरवली. या आदेशाविरोधात राणा-रसाळ आणि शिंदे यांनी जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले होते. सुनावणीदरम्यान अपीलकर्त्या उमेदवारांच्या वकिलांनी, संबंधित त्रुटी ही किरकोळ असून उमेदवारांना दुरुस्तीची संधी दिली गेली नाही, असा युक्तिवाद मांडला. मात्र दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय योग्य असल्याचे नमूद करत अपील फेटाळले. त्यामुळे दोन्ही उमेदवारांचे अर्ज अंतिमतः अवैध ठरले आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी न्यायालयीन आदेशाला दुजोरा देत निर्णयाची पुष्टी केली. तथापि, रात्रीपर्यंत अधिकृत आदेशाची प्रत उपलब्ध न झाल्याने पुढील तपशील समजू शकले नाहीत.
राजकीय वर्तुळात उत्सुकता
प्रभाग १० मध्ये आधीच अपक्षांची संख्या लक्षणीय असल्याने या दोन अर्जांबाबत कोणता निकाल लागू पडतो, याकडे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले होते. न्यायालयीन निर्णयाची उत्सुकता दिवसभर जाणवत होती आणि अखेर निकाल लागल्यानंतर स्थानिक राजकीय परिसरात चर्चांना उधाण आले आहे.

