(मुंबई)
सर्वाधिक अत्याधुनिक स्मार्ट मीटर बसवून देशात प्रथम क्रमांक पटकावण्याच्या महाराष्ट्राच्या कामगिरीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या महावितरणचा ‘बिग इम्पॅक्ट’ पुरस्काराने मुंबई येथे बुधवारी (२५ फेब्रुवारी) गौरव करण्यात आला. मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये आयोजित या कार्यक्रमात ९२.७ बिग एफएम या लोकप्रिय रेडिओ चॅनलच्या वतीने विविध क्षेत्रात कल्पकता व नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे समाजावर सकारात्मक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा पुरस्काराने गौरव करण्यात आला.
मुंबई महानगरपालिकेच्या महापौर श्रीमती रितू तावडे आणि अभिनेत्री ईशा देवोल यांच्या हस्ते महावितरणच्या वतीने कार्यकारी संचालक श्री. धनंजय औंढेकर, मुख्य अभियंता श्री. प्रवीण परदेशी, मुख्य जनसंपर्क अधिकारी श्री. भारत पवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. आशिष शेलार, जेष्ठ अभिनेते बोम्मण ईराणी यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला होती. पुरस्कार वितरणाच्या नेत्रदिपक कार्यक्रमाला तर सिनेसृष्टी, सामाजिक, राजकीय, उद्योग, कला क्षेत्रातील नामवंत उपस्थित होत्या.
ग्राहकांना अचूक बिलासोबत विविध सुविधा उपलब्ध करून देणारे ८८.५० लाख अत्याधुनिक स्मार्ट मीटर बसवून महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. राज्याच्या या यशात महावितरणची कामगिरी प्रमुख आहे. शंभर टक्के अचूक बिल, ग्राहकांना दर तासाला मोबाईलवर विजेचा वापर समजण्याची सुविधा, सवलतीच्या वीजदराच्या काळात अधिक वीजवापराची उपकरणे वापरण्याचे नियोजन करणे व विजेचा वापर नियंत्रणात ठेवण्याची संधी असे अनेक लाभ असलेले स्मार्ट मीटर महावितरणकडून मोफत बसविण्यात येत आहेत. स्मार्ट मीटर बसविलेल्या घरगुती वीज ग्राहकांना दिवसाच्या वीज वापराबद्दल प्रती युनिट ८० पैसे टीओडी सवलतही देण्यात येत आहे. तसेच औद्योगिक आणि वाणिज्यिक वीज ग्राहकांनाही सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीतील वीज वापरासाठी वीजदरात सवलत देण्यात येत आहे.
राज्यात ९ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी या कालावधीत स्मार्ट मीटर जनजागृती पंधरवडा साजरा करण्यात आला. यात विविध उपक्रमांच्या माध्यमातून स्मार्ट मीटरच्या लाभांबाबत राज्यभरात जनजागृती करण्यात आली.
फोटो : स्मार्ट मीटर बसवण्यात देशात अव्वल स्थान पटकावण्याच्या कामगिरीबद्दल महावतिरणला मिळालेला ‘बिग इम्पॅक्ट’ पुरस्कार मुंबई मनपाच्या महापौर श्रीमती रितू तावडे आणि अभिनेत्री ईशा देवोल यांच्या हस्ते स्वीकारताना कार्यकारी संचालक श्री. धनंजय औंढेकर, मुख्य अभियंता श्री. प्रवीण परदेशी, मुख्य जनसंपर्क अधिकारी श्री. भारत पवार.

