( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील हातखंबा येथे शासन-प्रशासनाचे नियम आणि कायद्याची भीती पूर्णपणे संपल्याचे एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक चित्र समोर आले आहे. एका अत्यंत निगरगट्ट आणि मनमानी करणाऱ्या खाजगी जमीन मालकाने कायद्याला न जुमानता सर्वच हद्दी पार केल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) नैसर्गिक पाण्याचा निचरा होण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून तयार केलेल्या मोरीच्या (Culvert) बोगद्यात चक्क शासकीय मातीचाच भराव टाकून स्वतःeच्या फायद्यासाठी रस्ता लाटण्याचा प्रकार या महाभागाने केला आहे. सार्वजनिक मालमत्तेची उघडपणे विल्हेवाट लावून पर्यावरणाला आणि स्थानिक वस्तीला धोक्यात आणणाऱ्या या कृत्याविरोधात रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी (District Collector) स्वतः लक्ष घालून या मुजोर जमीन मालकावर भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायद्यान्वये (PDPP Act) थेट फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी आक्रमक मागणी आता स्थानिक नागरिक कांबळे यांनी माध्यमांद्वारे केली आहे.
हातखंबा तिठा परिसरातील कांबळे यांच्या वस्तीजवळ हा संपूर्ण प्रकार घडला आहे. या निगरगट्ट जागे मालकाने थेट जेसीबी आणून मोरीच्या बोगद्यात माती ढकलण्याचे काम सुरू केले. हा प्रकार पाहताच स्थानिक रहिवासी कांबळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत या मनमानी कारभाराला तीव्र आक्षेप घेतला आणि संबंधित जागे मालकाला जागेवरच खडे बोल सुनावले. त्यावेळी या मुजोर जागे मालकाने, “मी माझ्या वैयक्तिक जागेत जाण्यासाठी मोरीच्या बोगद्यातून रस्ता तयार करतोय,” असे सांगत स्वतःच्या शहाणपणाचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, “ही मोरीच शासनाने पाणी जाण्यासाठी बांधली आहे, तुम्ही प्रशासनाला व स्थानिकांना कोणतीही कल्पना न देता इथे माती कशी काय टाकू शकता?” असा रोखठोक सवाल स्थानिकांनी उपस्थित करताच जागे मालकाची चांगलीच तारांबळ उडाली. त्याने तिथे सारवासारव करत तात्पुरते काम थांबवण्याचे नाटक केले.
दरम्यान दिवसा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर स्थानिकांनी तातडीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे (NHAI) प्रकल्प अधिकारी आणि महामार्गाचे प्रतिनिधी यांच्याशी दूरध्वनीद्वारे थेट संपर्क साधून या बेकायदेशीर कृत्याची सविस्तर माहिती दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर हा प्रकार घातल्यानंतर प्रशासकीय ढिलाईचा फायदा घेत काही काळ बंद राहिलेले हे बेकायदेशीर काम रात्रीच्या अंधारात पुन्हा हळूच सुरू करण्यात आले! प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ कल्पना देऊनही रात्रीत पुन्हा जेसीबी आणून काम झालेच कसे? हाच आता या प्रकरणातील सर्वात मोठा संशय ठरत असून महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
हातखंब्यातील या धक्कादायक प्रकारानंतर आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची (NHAI) कायद्याविषयीची आणि कर्तव्याविषयीची विश्वासार्हताच पूर्णपणे वेशीवर टांगली गेली आहे. या बेकायदेशीर कृत्याबाबत जेव्हा ठेकेदार कंपनीचे लायजिंग मॅनेजर यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा त्यांनी हात वर करत “सदर कामकाजाशी आमचा कोणताही संबंध नाही, ते आमचे काम नसल्याचे सांगून आपली जबाबदारी झटकली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, महामार्ग भू-संपादनाचे काम पाहणारे प्राधिकरणाचे प्रतिनिधी अनिल सिंग यांनीही “या गंभीर प्रकाराबाबत आपल्याला कोणतीही कल्पना नाही” असा अजब दावा केला आहे. “वरिष्ठांना याबाबत अवगत केले असून आज, २९ ऑक्टोबर रोजी घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल,” अशी गुळमुळीत भूमिका अनिल सिंग यांनी घेतली आहे.
सार्वजनिक निधीतून उभारलेल्या सुविधेच्या वापरात अनधिकृत बदल होत असल्याची तक्रार समोर आल्यानंतर प्रशासनाने तत्परतेने हालचाल करणे अपेक्षित आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवूनही रात्रीत काम सुरू राहणे हे थेट प्रशासनाला दिलेले आव्हान ठरले आहे. या निगरगट्ट जमीन मालकाने केवळ प्रशासकीय नियमांचे उल्लंघन केले नसून थेट कायद्याचे उल्लंघन केले आहे. या प्रकरणी विविध कायदे – कलमांनुसार तात्काळ गुन्हे दाखल होणे आवश्यक आहे. याबाबत आता स्थानिक ग्रामस्थांनी आता आरपारची लढाई लढण्याची तयारी केली असून, प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून ‘ढिलाई’ की ‘दणका’ दिला जातो हे २९ ऑक्टोबर रोजी कायदेशीर कारवाई केल्यानंतर स्पष्ट होणार आहे.


