(मुंबई)
गुगल मॅप्स अॅपमध्ये आता नवीन पॉवर सेव्हिंग मोड उपलब्ध झाला असून, सुरुवातीला तो फक्त पिक्सेल 10 सिरीजच्या स्मार्टफोनसाठी जारी करण्यात आला आहे. नेव्हिगेशनदरम्यान बॅटरीचा वापर कमीत कमी ठेवण्यासाठी हा मोड खास तयार करण्यात आला आहे. नोव्हेंबर पिक्सेल फीचर ड्रॉपमध्ये या फीचरची प्रथम घोषणा करण्यात आली होती आणि आता ते वापरकर्त्यांना उपलब्ध होत आहे.
या मोडमध्ये गुगल मॅप्सचा इंटरफेस ब्लॅक-अॅण्ड-व्हाईट स्वरूपात बदलतो. स्क्रीनची ब्राइटनेस आणि रिफ्रेश रेट आपोआप कमी केली जाते, तसेच फक्त आवश्यक नेव्हिगेशन माहितीच स्क्रीनवर दाखवली जाते. यामुळे लांब प्रवासादरम्यान फोनची बॅटरी लक्षणीय प्रमाणात वाचते.
सध्या हा पॉवर सेव्हिंग मोड पिक्सेल 10, पिक्सेल 10 प्रो, पिक्सेल 10 XL आणि पिक्सेल 10 प्रो फोल्ड या मॉडेल्ससाठीच उपलब्ध आहे. तसेच हा मोड केवळ ड्रायव्हिंग नेव्हिगेशन मध्ये कार्यरत राहणार असून, वॉकिंग आणि बाइकिंग नेव्हिगेशनसाठी तो उपलब्ध नाही.
फीचर वापरण्यासाठी वापरकर्त्यांनी गुगल मॅप्समधील Settings → Navigation → Driving या पर्यायांमध्ये जाऊन पॉवर सेव्हिंग मोड उपलब्ध आहे का हे तपासावे आणि तो ऑन करावा. नेव्हिगेशन सुरू झाल्यावर फोनचे पॉवर बटण दाबल्यास लो-पॉवर मॅप व्ह्यू आपोआप सक्रिय होतो. स्क्रीनवर कुठेही टच केल्यास किंवा पुन्हा पॉवर बटण दाबल्यास हा मोड बंद होतो. पुन्हा मोड सुरू करण्यासाठी फक्त पॉवर बटण एकदा दाबणे पुरेसे असते.
गुगलच्या मते, हा नवीन पॉवर सेव्हिंग मोड स्टॅंडर्ड नेव्हिगेशनच्या तुलनेत बॅटरी लाइफ लक्षणीयरीत्या वाढवू शकतो. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासावर जाणाऱ्या पिक्सेल वापरकर्त्यांसाठी हे फीचर विशेषतः उपयुक्त ठरणार आहे.

