(विल्ये / अमित कांबळे)
रत्नागिरी तालुक्यातील मौजे कळझोंडी ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा २ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता ग्रामपंचायत कार्यालय कळझोंडी येथील भव्य सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. गावातील मतदार बंधू-भगिनींनी या विशेष ग्रामसभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रामविकास अधिकारी अमोल केदारी व प्रशासकीय अधिकारी पी. एन. सुर्वे यांनी केले आहे.
या विशेष ग्रामसभेत गावातील शाळांमधील विद्यार्थी पटनोंदणी आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या मूलभूत सुविधांचा आढावा घेऊन भौतिक व मानवी सुविधांबाबत चर्चा केली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासंदर्भातही ग्रामसभेत चर्चा करण्यात येणार असून, शाळा व्यवस्थापन व इतर संबंधित बाबींवर विचारविनिमय केला जाणार आहे. त्याचबरोबर सायबर गुन्हेगारीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने चर्चा व मार्गदर्शन केले जाणार आहे.
‘स्वच्छता ही सेवा’ (SHS) २०२६ अभियानांतर्गत स्वच्छ भारत दिवसाच्या निमित्ताने विशेष उपक्रम राबविण्याबाबतही ग्रामसभेत चर्चा होणार आहे. या विविध महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन, चर्चा तसेच आवश्यक निर्णय घेण्यात येणार आहेत. त्यामुळे कळझोंडी ग्रामपंचायतीच्या या विशेष ग्रामसभेला गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासक पी. एन. सुर्वे आणि ग्रामविकास अधिकारी अमोल केदारी यांनी केले आहे.


