(रत्नागिरी /प्रतिनिधी)
शहरातील रस्त्यांवर दुचाकींच्या कर्कश आवाजाने नागरिकांच्या कानठळ्या बसविणाऱ्या वाहनचालकांविरोधात रत्नागिरी शहर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. मॉडिफाइड सायलेन्सर लावून शहरात ध्वनिप्रदूषण करणाऱ्या १० दुचाकींवरील कर्कश सायलेन्सर जप्त करण्यात आले असून, संबंधित वाहनचालकांकडून तब्बल २९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
शहरातील प्रमुख रस्त्यांवर मॉडिफाइड दुचाकींचा वाढता धुमाकूळ नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. वाहनांच्या मूळ रचनेत अनधिकृत बदल करून बसविण्यात आलेल्या सायलेन्सरमधून मोठ्या आवाजात दुचाकी दामटण्याचे प्रकार वाढले आहेत. या कर्कश आवाजामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच रस्त्यालगतच्या रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहर पोलिसांनी अशा वाहनचालकांवर लक्ष केंद्रित करत तपासणी मोहीम राबविली. कारवाईदरम्यान नियमबाह्य पद्धतीने बसविण्यात आलेले कर्कश सायलेन्सर असलेल्या दुचाकी आढळून आल्या. पोलिसांनी संबंधित वाहनांवरील सायलेन्सर काढून जप्त केले, तसेच वाहनचालकांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई केली.
ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्याबरोबरच शहरातील शांतता अबाधित ठेवण्याचा पोलिसांचा प्रयत्न या कारवाईतून अधोरेखित झाला आहे. केवळ हौस म्हणून वाहनांमध्ये अनधिकृत बदल करून कर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसविणाऱ्या दुचाकीस्वारांना या कारवाईमुळे चांगलाच दणका बसला आहे. शहरातील ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि वाहतूक नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सुरूच राहतील, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांनी वाहनांमध्ये अनधिकृत फेरबदल करणे टाळावे आणि नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

