(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे आज (मंगळवार, २९ सप्टेंबर) रोजी अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव भक्तीभाव, उत्साह आणि शांततेत पार पडला. या यात्रोत्सवानिमित्त घाटमाथ्यावरील सुमारे ५० ते ६० हजार भाविकांनी गणपतीपुळे येथील स्वयंभू श्रींचे मनोभावे दर्शन घेतल्याची माहिती देवस्थान समितीकडून देण्यात आली.
अंगारकी चतुर्थीनिमित्त स्वयंभू श्रींचे मंदिर पहाटे साडेतीन वाजता भाविकांसाठी खुले करण्यात आले. त्यापूर्वी गणपती मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांच्या हस्ते पूजाअर्चा, मंत्रपुष्प आणि आरती करण्यात आली. त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिरात सोडण्यात आले. दर्शन सुलभ आणि शिस्तबद्ध पद्धतीने होण्यासाठी देवस्थान समितीने मंदिर परिसरात विशेष दर्शन रांगांची व्यवस्था केली होती. रांगेत उभ्या असलेल्या भाविकांसाठी पिण्याचे पाणी तसेच अन्य मूलभूत सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या.
दर्शन रांगांमधील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांसोबतच रत्नागिरी येथील श्री अनिरुद्ध बापू उपासना ट्रस्टच्या स्वयंसेवकांनीही विशेष कामगिरी बजावली. जयगड पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत सुमारे १५ पोलीस अधिकारी आणि १३८ पोलीस कर्मचाऱ्यांनी मंदिर व परिसरातील बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळली. यामध्ये वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांचाही सहभाग होता.
भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मंदिर परिसरात मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले होते. तसेच संभाव्य आग लागण्याची दुर्घटना लक्षात घेऊन रत्नागिरी नगर परिषदेच्या वतीने अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. आपत्कालीन सेवेसाठी देवस्थान समितीच्या वतीने रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आली होती.
अंगारकी चतुर्थीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन रत्नागिरी एसटी महामंडळाकडून घाटमाथ्यावरील भाविकांसाठी विशेष जादा गाड्या सोडण्यात आल्या. त्यामुळे घाटमाथ्यावरील अनेक ठिकाणांहून भाविक मोठ्या संख्येने गणपतीपुळ्यात दर्शनासाठी दाखल झाले. समुद्रकिनारी कोणतीही दुर्घटना किंवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणेसह होमगार्ड, जीवरक्षक आणि गणपतीपुळे देवस्थान समितीच्या सुरक्षारक्षकांनी गस्त घालून विशेष खबरदारी घेतली.
अंगारकीच्या पार्श्वभूमीवर घाटमाथ्यावरील विविध दुकानदारही गणपतीपुळ्यात दाखल झाले होते. त्यामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना यात्रेचा आनंद घेता आला. कोल्हापूर आणि सांगली येथील काही गणेश मंडळांकडून भाविकांसाठी सकाळच्या सत्रात खिचडी, तर सायंकाळच्या सत्रात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. अनेक भाविकांनी त्याचा लाभ घेतला.
दरम्यान, अंगारकी चतुर्थीनिमित्त देवस्थान समितीच्या वतीने सायंकाळी साडेचार वाजता स्वयंभू श्रींची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात, वाजत-गाजत आणि फटाक्यांच्या आतषबाजीत ही मिरवणूक पार पडली. यामध्ये पुजारी, कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ, भाविक आणि पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रात्री उशिरापर्यंत भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने आणि श्रद्धाभावाने स्वयंभू श्रींचे दर्शन घेतले. दर्शनाच्या रांगांमधून ‘मंगलमूर्ती मोरया’चा जयघोष सुरू असल्याने गणपतीपुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव सुरळीत आणि शांततेत पार पडण्यासाठी गणपतीपुळे देवस्थान समिती, ग्रामपंचायत गणपतीपुळे, पोलीस यंत्रणा तसेच अन्य सर्व विभागांनी विशेष मेहनत घेतली.


