(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मुंबई-गोवा महामार्गावर पाली येथील जोशीवाडी परिसरात भरधाव कारने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. सोमवारी (२८ सप्टेंबर) सकाळी साडेअकराच्या सुमारास श्रद्धा सबुरी हॉटेलसमोर हा अपघात झाला. मनोहर बारी (वय५२, रा. पाली, रत्नागिरी) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव असून त्यांची पत्नी मीनल बारी ( वय ४७) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोहर बारी हे पत्नी मीनल यांच्यासोबत दुचाकी क्रमांक एमएच ०८ एसी ४९७३ वरून पालीकडून रत्नागिरीच्या दिशेने जात होते. सकाळी सुमारे ११.३५ वाजता ते जोशीवाडी बसथांब्याजवळील श्रद्धा सबुरी हॉटेलसमोर आले असता कोल्हापूरहून रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या ह्युंदाई ऑरा (एमएच १४ एलयू ९७६७) कारने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. प्राथमिक माहितीनुसार, कारचालक सुशांत रमेश नेरलेकर (३८, रा. जुना बुधवार पेठ, कोल्हापूर) याने वाहन हयगयीने, निष्काळजीपणे आणि वेगाने चालविल्याने हा अपघात झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. धडकेनंतर मनोहर आणि मीनल बारी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर कारचालकाने दोन्ही जखमींना स्वतःच्या वाहनातून रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मनोहर बारी यांना तपासून मृत घोषित केले. मीनल बारी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर दुचाकी रस्त्याच्या कडेला हलविण्यात आली. घटनेची माहिती मिळताच हातखंबा वाहतूक मदत केंद्र तसेच रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार घटनास्थळी दाखल झाले. या अपघाताची पुढील कारवाई ग्रामीण पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडून सुरू आहे.


