(पोलादपूर)
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील भोगाव गावाजवळ आज सोमवारी (दि. २४) पहाटे साडेचारच्या सुमारास भीषण अपघात झाला. पुण्याहून खेडकडे जाणारी मिनी ट्रॅव्हलर बस महामार्गावरील पुलापूर्वी ठेवलेल्या बॅरिकेडला धडक दिल्यानंतर तब्बल 50 फूट दरीत कोसळली. या दुर्घटनेत २२ प्रवाशी गंभीर जखमी झाले असून त्यापैकी १० जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.
गेल्या काही दिवसांपासून पोलादपूर ते खेड दरम्यानच्या भुयारी मार्गाकडे जाणाऱ्या महामार्गाचे काम सुरू असल्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील एक लेन बंद ठेवण्यात आली आहे. पहाटे धुके असल्याने रिफ्लेक्टर नसलेले लोखंडी संरक्षक कठडे चालक सूरज गागनाथ अलकुंटे (वय 25, रा.कात्रज, पुणे, मूळ रा.अलकुंटे, जि.सोलापूर) याच्या नजरेस न पडल्याने या लोखंडी संरक्षक कठडयांना श्रीसाई ट्रॅव्हल्सची मिनी बस (एमएच 12 वायबी 2835)ची धडक बसताच लोखंडी कठडेदेखील काँक्रीटने जमिनीत ठासले नसल्याने लोखंडी कठडयांसह मिनीबस थेट दरीकडे झेपावली. यावेळी बसमधील प्रवाशांच्या किंचाळण्यासह बसच्या धडकेमुळे लोखंडी कठडयांचा कर्णकर्कश्य आवाज झाल्याने स्थानिक नागरिकांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आणि मिनीबसमधील जखमींना महामार्गावर आणले. पोलादपूर पोलीस व महामार्ग सुरक्षा पथकानेही घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू करीत जखमींना खेड-कळंबणी येथील रत्नागिरी उपजिल्हा रूग्णालयामध्ये दाखल केले.
सध्या खेड तालुक्यातील कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात खालील जखमींवर उपचार सुरू आहेत :
– शामल विजय अंजर्लेकर (40, रा. गिम्हवणे, दापोली)
– काजल मारुती शिगवण (23, रा. दमामे, दापोली)
– दिलीप शिवराम मोहिते (55, रा. तळसर, चिपळूण)
– अमरनाथ मिलिंद कांबळे (27, रा. लातूर)
– दिपाली दत्ताराम नाचरे (27, रा. भडवणे, दापोली)
– प्रतीक प्रकाश गुरव (22, रा. शिरवली, खेड)
– प्रिया प्रकाश गुरव (23, रा. शिरवली, खेड)
– आळंदी बालाजी नाचरे (74, रा. दमामे, दापोली)
– सर्वेश दीपक गुहागरकर (22, रा. आडे, दापोली)
– मयुरी मारुती शिगवण (45, रा. दमामे, दापोली)
याशिवाय चालक, वाहक आणि इतर दहा प्रवाशांना चिपळूणमधील खासगी रुग्णालयात तसेच डेरवण रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी महामार्ग पोलिसांनी विशेष पथके तैनात केली आहेत. धुके, सुरू असलेली कामे आणि अपुरी बॅरिकेडिंग यामुळे हा अपघात घडल्याची माहिती समोर येत असून पुढील तपास पोलादपूर पोलिसांकडून सुरू आहे.

