(संगमेश्वर / वार्ताहर)
संगमेश्वर तालुक्यातील कडवई गावचे माजी सरपंच, शिवसेना विभागप्रमुख तसेच पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे सचिव वसंत उजगावकर यांचे आज (सोमवारी) सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने कडवई परिसरावर शोककळा पसरली असून, जनसामान्यांच्या अडचणीच्या काळात तत्परतेने धावून जाणारा आणि प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होणारा जिव्हाळ्याचा ‘आपला माणूस’ हरपल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
‘जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा’ या भावनेतून वसंत उजगावकर यांनी सामाजिक कार्याला सातत्याने प्राधान्य दिले. गावातील सामाजिक उपक्रम असो, एखाद्या गरजूला मदतीची आवश्यकता असो किंवा एखाद्या कुटुंबावर संकट ओढवले असो, अशा प्रत्येक प्रसंगी ते मदतीसाठी पुढे असायचे. पदापेक्षा माणुसकीला महत्त्व देत त्यांनी सर्वसामान्यांशी आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले होते.
काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पुढाकारातून शिवसेना शाखेचा शुभारंभ करण्यात आला होता. या शाखेच्या माध्यमातून पक्षीय कार्यासोबतच सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देणे आणि विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला होता. शाखेच्या उद्घाटनावेळी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी उजगावकर यांच्या सामाजिक कार्याचे आणि जनसंपर्काचे विशेष कौतुक केले होते.
कडवई गाव तसेच पंचक्रोशीतील विविध सामाजिक आणि सार्वजनिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. कोणत्याही व्यक्तीच्या अडचणीच्या काळात मदतीला धावून जाण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे परिसरातील नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष जिव्हाळा निर्माण झाला होता. त्यांच्या अचानक निधनामुळे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
“जनसामान्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेला आमचा माणूस आता देवाची सेवा करण्यासाठी गेला,” अशा भावनिक शब्दांत ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या मनमिळावू स्वभावाच्या, मदतीसाठी तत्पर असलेल्या वृत्तीच्या आणि सामाजिक बांधिलकीच्या आठवणींना उजाळा देत ग्रामस्थांनी वसंत उजगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.


