(गणपतीपुळे / वैभव पवार)
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)च्या तालुका कार्यकारिणीची विशेष बैठक दिक्षाभूमी बुद्धविहार, वाटद-खंडाळा येथे तालुका अध्यक्ष मंगेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविणे, प्रत्येक गावात पक्षाच्या शाखा स्थापन करणे आणि विभागनिहाय संघटन मजबूत करण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.
बैठकीला कोकण प्रदेश प्रवक्ते भाई जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष विलास कांबळे, जिल्हा सदस्य रजत पवार, ज्येष्ठ सदस्य विजय आयरे, दिनकर कांबळे तसेच तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पक्ष संघटनेच्या विस्ताराबाबत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. आगामी काळात संघटना वाढीसाठी अधिक प्रयत्न करण्यावर विशेष भर देण्याचे ठरविण्यात आले.
प्रत्येक गावात पक्षाची शाखा स्थापन करणे, विभागनिहाय पक्ष संघटन मजबूत करणे तसेच आगामी नोव्हेंबर महिन्यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची वेळ घेऊन जाहीर मेळावा आयोजित करण्याबाबत बैठकीत निर्णय घेण्यात आला. तसेच ३ ऑक्टोबर २०२६ रोजी वाशी, मुंबई येथे होणाऱ्या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
संघटना विस्ताराच्या पार्श्वभूमीवर तरुण कार्यकर्त्यांवर विभागनिहाय जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या. वाटद विभागीय अध्यक्षपदी राजेंद्र जाधव, कोतवडे विभागीय अध्यक्षपदी सिद्धार्थ आयरे, कोतवडे उपाध्यक्षपदी हेमंत कांबळे आणि जयगड शाखा अध्यक्षपदी उमेश सावंत यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच निवेंडी शाखा अध्यक्षपदी मीनानाथ कदम यांची नियुक्ती करण्यात आली.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना तालुका अध्यक्ष मंगेश सावंत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी त्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. बैठकीच्या शेवटी सचिव उज्वल कांबळे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. त्यानंतर विशेष बैठकीची सांगता करण्यात आली.


