( रत्नागिरी / वार्ताहर )
पदवीदान समारंभ हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा मैलाचा दगड असून, यशाच्या प्रवासात अनेकांचे योगदान असते. त्यामुळे मिळालेल्या ज्ञानाचा समाजहितासाठी जबाबदारीने आणि संवेदनशीलतेने उपयोग करणे ही प्रत्येक विद्यार्थ्याची जबाबदारी आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), हवामान बदल आणि जागतिकीकरणामुळे समाज झपाट्याने बदलत आहे. या बदलत्या काळात विद्यार्थ्यांनी सकारात्मक परिवर्तनाचे माध्यम बनावे. ईशोपनिषदातील विचारांप्रमाणे ज्ञानातून सत्याचा धर्म आणि खऱ्याचा मार्ग समाजाला दाखविण्याचे कार्य घडावे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाचे प्रमुख प्रो. डॉ. विवेक बेल्हेकर यांनी केले.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात आयोजित पदव्युत्तर पदवीदान सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत घेण्यात आलेल्या पदव्युत्तर परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन होत्या. अध्यक्षीय भाषणात त्यांनी शिक्षणातून माणुसकीची जपणूक होणे आवश्यक असल्याचे सांगितले. “माणुसकी नसेल तर माणूसपणालाच अर्थ उरत नाही,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना वेळेचे महत्त्व ओळखण्याचा, नवनवीन गोष्टी शिकण्याचा आणि प्रामाणिक परिश्रमातून यश संपादन करून समाजाच्या कल्याणासाठी त्याचा उपयोग करण्याचा संदेश दिला.
यावेळी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे नियामक मंडळ सदस्य डॉ. चंद्रशेखर केळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. सीमा कदम तसेच परीक्षा नियंत्रक डॉ. विवेक भिडे उपस्थित होते.
विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत झालेल्या पदव्युत्तर परीक्षेचा महाविद्यालयाचा निकाल ८६ टक्के लागल्याची माहिती दिली. महाविद्यालयातील १६ पदव्युत्तर विभागांतील १६ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यात आली. तसेच संशोधन केंद्रातून पीएच.डी. प्राप्त केलेल्या डॉ. अश्विनी देवस्थळी यांना सुवर्णपदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याशिवाय ९ गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी विद्यार्थ्यांनी पदवीसोबत सामाजिक जबाबदारीही स्वीकारावी, तसेच आई-वडील, कुटुंब आणि शिक्षकांप्रती कायम कृतज्ञ राहावे, असे आवाहन केले. नियामक मंडळाचे सदस्य डॉ. चंद्रशेखर केळकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत सद्गुणांची जोपासना करून आदर्श नागरिक बनण्याचा संदेश दिला.

