( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कथित चुकीच्या सर्व्हेमुळे तसेच विकासकामांतील अनियमिततेविरोधात ‘माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र राज्य’तर्फे राजापूर-लांजा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर लाक्षणिक उपोषण छेडण्यात आले. या उपोषणात जिल्हाध्यक्ष मनोहर गुरव यांच्या उपस्थितीत रत्नागिरी जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता.
महासंघाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राजापूर-लांजा विभागावर शासन व जनतेची दिशाभूल, तसेच फसवणुकीचे आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. तसेच ‘भारती एअरटेल कंपनी लिमिटेड’ पुणे व सार्वजनिक बांधकाम विभाग रत्नागिरी यांच्याकडून अटी व शर्तींचा भंग झाल्याने, अट क्र. २४ नुसार अतिरिक्त खोदकामासाठी ५ हजार रुपये प्रति मीटर दंड आकारावा, अशी मागणी करण्यात आली. उपोषणा दरम्यान दुपारी संबंधित अधिकारी उपोषणस्थळी येऊन मागण्या मान्य करण्याचे लेखी पत्र देताच, कार्यवाही होईपर्यंत उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती जिल्हा सचिव पद्मनाभ कोठारकर यांनी दिली.
दरम्यान आरटीआय महासंघाचे जिल्हाध्यक्ष मनोहर गुरव यांनी जनतेवरील अन्याय, विकासाच्या नावाखालील भ्रष्टाचार, जलजीवन मिशनमधील गैरव्यवहार आणि निकृष्ट दर्जाचे रस्ते याविरोधात तीव्र शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली.
यावेळी लांजा तालुकाध्यक्ष सौ. साक्षी पराडकर, उपाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, संगमेश्वर तालुक्यातील सुनिल करंडे, प्रमोद रेवणे, प्रसाद कांगणे, प्रकाश खांडेकर, लता करंबेळे, अरविंद मोहिते यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

