(दापोली/ रत्नागिरी)
विनापरवाना दारू विक्रीचा व्यवसाय करण्याच्या उद्देशाने बेकायदा दारूसाठा बाळगल्याप्रकरणी दाभोळ पोलिसांनी एका ६० वर्षीय व्यक्तीविरोधात कारवाई केली. मळे-भोपण फाटा येथे रविवारी (२७ सप्टेंबर) रात्री ही कारवाई करण्यात आली. संशयिताकडून एकूण ३ हजार ९०० रुपये किमतीचा दारूसाठा जप्त करण्यात आला.
दिलीप गोविंद खळे (६०, रा. भोपण हरेकरवाडी, ता. दापोली) असे कारवाई करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी दाभोळ सागरी पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल दैवत दिलीप राणे यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २७ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मळे-भोपण फाटा येथे खळे याच्याकडे विनापरवाना दारूसाठा आढळून आला. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दारूची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने हा साठा बाळगल्याचा आरोप आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी मास्टर डिलाईट प्रीमियम व्हिस्कीच्या १८० मिलीच्या १४ सीलबंद बाटल्या (किंमत २,१०० रुपये), ९० मिलीच्या नऊ सीलबंद बाटल्या (७२० रुपये) तसेच लंडन पिल्सनर प्रीमियम स्ट्राँग बिअरच्या ५०० मिलीच्या आठ सीलबंद टिन (१,०८० रुपये) असा एकूण ३,९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दाभोळ पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


