(जैतापूर / वार्ताहर)
जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याला जपानहून आलेल्या एका पर्यटकाने आवर्जून उपस्थिती लावली. गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना सुरू असतानाचे भक्तिमय वातावरण पाहून ते भारावून गेले. यावेळी त्यांनी गणेशमूर्तीचे फोटो आणि व्हिडिओही काढले.
मंडळाच्या उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी गणेशोत्सवाविषयी उत्सुकतेने माहिती जाणून घेतली. आपण गेल्या दोन वर्षांपासून या परिसरात येत असून, यंदा प्रथमच जैतापूरमधील गणेशोत्सव प्रत्यक्ष पाहत असल्याचे त्यांनी सांगितले.
जैतापूरमधील नागरिकांची आपुलकीही या पर्यटकाला विशेष भावली. शहर आणि गावातील लोकांच्या वागणुकीत बराच फरक जाणवतो. शहराच्या तुलनेत गावातील लोक अधिक प्रेमळ आणि आपुलकीने वागतात, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. जैतापूर गावातील नागरिकांनी आपला चांगला आदरभाव केल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
मात्र, आपला चेहरा आणि चेहऱ्याची ठेवण येथील लोकांपेक्षा थोडी वेगळी असल्याने अनेकजण आपल्याकडे कुतूहलाने निरखून पाहतात. त्यामुळे काही वेळा थोडासा संकोच वाटत असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. त्याचवेळी जैतापूरकरांनी दाखवलेल्या प्रेमळ वागणुकीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
परदेशातून आलेल्या पाहुण्याने जैतापूरच्या गणेशोत्सवाचा अनुभव घेत स्थानिक संस्कृती, श्रद्धा आणि माणुसकीचे केलेले कौतुक उपस्थितांसाठीही आनंदाचा क्षण ठरला.
यावेळी जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष गिरीश करगुटकर, पत्रकार राजन लाड, खजिनदार श्रीकृष्ण राऊत, सचिव सुनील करगुटकर, मनीष करगुटकर, महेश नारकर, रेशम लाड, राजेंद्रप्रसाद राऊत, गजानन करमळकर आदींसह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. मंडळाच्या वतीने जपानहून आलेल्या पर्यटकाचे औचित्यपूर्ण स्वागत व सन्मान करण्यात आला.


