(गणपतीपुळे / वैभव पवार)
जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ म्हणून विकसित झालेल्या गणपतीपुळे परिसरातील वाढती पर्यटकांची वर्दळ आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन पुढील २० ते २५ वर्षांचा सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करावा, अशी मागणी भगवतीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा जागरूक नागरिक वैभव राजाराम घाग यांनी पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी रत्नागिरी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन दिले आहे.
गणपतीपुळे परिसरातील रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन, पार्किंग, वाहतूक कोंडी तसेच वाढत्या बांधकामांमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य समस्यांचा आत्तापासूनच विचार करून नियोजन करण्याची गरज असल्याचे घाग यांनी निवेदनात म्हटले आहे. पुढील २० ते २५ वर्षांनंतरही या परिसरात रस्ते, सांडपाणी, पार्किंग आणि वाहतुकीसंदर्भातील समस्या निर्माण होऊ नयेत, यासाठी संबंधित ग्रामपंचायतींना मार्गदर्शन करून आवश्यक नियमावली तयार करावी आणि तिची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
गणपतीपुळे परिसरात भविष्यातील वाहतुकीचा विचार करून रस्त्यांचे रुंदीकरण, गटारांसाठी आवश्यक जागा आणि पार्किंगची उपलब्धता यांचे नियोजन करूनच बांधकामांना परवानगी देण्याची आवश्यकता असल्याचे घाग यांनी नमूद केले आहे. भविष्यातील पार्किंगसाठी आतापासूनच जागांचे नियोजन करणे महत्त्वाचे असून, या संपूर्ण प्रक्रियेत स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांना नियोजनाचे महत्त्व समजावून सांगावे, असेही त्यांनी म्हटले आहे. यासाठी आवश्यक नियमावली बंधनकारक करून तिच्या अंमलबजावणीत नागरिकांचा सहभाग असावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
गणपतीपुळे हे कोकणातील जागतिक कीर्तीचे पर्यटन क्षेत्र असल्याने येथे वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते. विशेषतः सुट्टीच्या दिवशी तसेच पावसाळा संपल्यानंतर पर्यटकांची संख्या वाढते. परिसरातील गावांमध्येही पर्यटकांच्या निवासाची मागणी वाढत असल्याने पर्यटक निवास आणि होम स्टेची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यातील पायाभूत सुविधांचे नियोजन आतापासूनच करणे आवश्यक असल्याचे घाग यांनी पत्रात नमूद केले आहे.
गणपतीपुळे परिसरातील रस्त्यांची सद्यस्थिती, रस्ते रुंदीकरणासाठी जागा उपलब्ध न होणे, गटारांची अपुरी व्यवस्था आणि सांडपाणी रस्त्यावर वाहण्याची परिस्थिती यामुळे नागरिकांसह पर्यटकांनाही अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्याचबरोबर वाहतूक कोंडी आणि नदी-नाल्यांमध्ये प्लास्टिक व इतर कचरा टाकला जाण्याच्या समस्येचेही योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे घाग यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी संबंधित गावांतील ग्रामपंचायती तसेच होम स्टेचालकांना विशेष मार्गदर्शन आणि आवश्यक नियम लागू करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. नियोजनबद्ध पद्धतीने या उपाययोजना राबविल्यास गणपतीपुळे परिसरातील रस्ते आणि गावे पर्यटकांसाठी अधिक आकर्षक पद्धतीने विकसित करता येतील, असे घाग यांनी पत्रात म्हटले आहे.
पुढील १० ते २० वर्षांचा विचार करून परिसरातील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता कायम राखणे, सांडपाण्याचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करणे, पार्किंगची सुविधा उपलब्ध करणे आणि इतर मूलभूत सुविधांचे नियोजन करण्यासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या कामात पर्यटन विकास महामंडळाचा सहभाग घेतल्यास नियोजनाला अधिक व्यापक स्वरूप मिळू शकते, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.
गणपतीपुळे परिसराच्या भविष्यातील पर्यटन विकासाचा विचार करून तातडीने सर्वसमावेशक आराखडा तयार करावा आणि त्यासोबतच रस्ते, सांडपाणी, पार्किंग, वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन यांसारख्या समस्यांवर आवश्यक कार्यवाही हाती घ्यावी, अशी मागणी वैभव राजाराम घाग यांनी केली आहे.


