(दापोली)
दापोली-साखळोली मार्गावरील देवाचा खळगा परिसरातील धोकादायक वळणावर बुधवारी (दि. २० मे) रोजी भीषण अपघात झाला होता. या अपघातातील गंभीर जखमी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. इको कार आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत शुभम फडकले (रा. फणसू) याचा आज मृत्यू झाला असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुभम फडकले आणि त्याचा मित्र अमन खांबे हे दोघे दुचाकीवरून दापोलीहून फणसूच्या दिशेने जात होते. दरम्यान, देवाचा खळगा येथील तीव्र आणि धोकादायक वळणावर समोरून येणाऱ्या इको कारसोबत त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक झाली.
अपघात इतका भीषण होता की शुभम फडकले गंभीर जखमी झाला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले. शुभमची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्याला मुंबईला हलवण्यात येत होते. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली.
या घटनेमुळे फणसू गावावर शोककळा पसरली असून परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, देवाचा खळगा परिसरातील हे वळण अत्यंत धोकादायक असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. या ठिकाणी यापूर्वीही अनेक अपघात घडले असून प्रशासनाने अद्याप ठोस उपाययोजना न केल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
या मार्गावर तातडीने इशारा फलक, वेग नियंत्रण व्यवस्था, रस्त्याचे मजबुतीकरण आणि सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

