(रत्नागिरी)
तालुक्यातील निवळी (शिंदेवाडी) येथे घडलेली दुर्घटना ही महावितरणच्या बेजबाबदार कारभाराचे क्रूर उदाहरण ठरली आहे. १७ जुलै रोजी तुटलेल्या आणि विद्युत प्रवाह असलेल्या वाहीनीचा शॉक बसून दोन निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना ‘अपघात’ नसून थेट महावितरणच्या हलगर्जीपणाचे भीषण फलित असल्याचे स्पष्टपणे प्राथमिक तपास अहवालात नमूद करण्यात आले आहे.
दुर्घटनेत चंद्रकांत यशवंत तांबे (वय ४०) आणि मुदुला वासुदेव वाडकर (वय ६०, दोघेही रा. निवळी) या दोन नागरिकांचा मृत्यू झाला. दोघे झाडाझुडपांची सफाई करत असतानाच जमिनीवर पडलेल्या वीज वाहिनीचा त्यांना स्पर्श झाला आणि ते जागीच मृत्युमुखी पडले. वास्तव इतकं भयावह आहे की, ही वीज वाहिनी तब्बल दोन दिवसांपासून तुटून पडली होती आणि तरीही महावितरणच्या यंत्रणेला याची कल्पनाच नव्हती!
या दुर्घटनेनंतर विद्युत निरीक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून सविस्तर अहवाल सादर केला आहे. या अहवालात म्हटले आहे की, वाहिनी तुटलेली असूनदेखील दुरुस्तीच्या कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या. त्याचप्रमाणे, तार मार्गावर आवश्यक त्या स्पेसर्स अथवा गार्ड लूप लावण्यात आले नव्हते आणि वाढलेली झाडांची फांदी कापण्यात आलेली नव्हती. म्हणजेच, ही संपूर्ण व्यवस्था झोपेत होती, आणि याचे दुष्परिणाम नागरिकांना प्राण गमावून भोगावे लागले. प्रशासनाने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत जाहीर करून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. पण प्रश्न असा आहे की, ‘महावितरणच्या अशा बेफिकीर व्यवस्थेला कोण वठणीवर आणणार?’
या संपूर्ण प्रकरणात महावितरणचा देखभाल आणि दुरुस्ती विभाग पूर्णतः अपयशी ठरला आहे. लोकांचे जीव धोक्यात येत असतानाही कोणतीही तातडीची कार्यवाही न केल्याचे चित्र समोर आले आहे.
महावितरणच्या गलथान कारभारामुळे सामान्य नागरिकांना प्राणांतिक संकटाला सामोरे जावे लागत आहे, आणि हे चित्र थांबवायचे असेल तर जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई अटळ आहे.