(संगमेश्वर / वार्ताहर)
छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाशी निगडित असलेल्या कसबा-संगमेश्वर येथील सरदेसाई वाड्याचे तातडीने संवर्धन व जतन करण्यात यावे, अशी मागणी समाजसेविका आणि चक्रभेदी सोशल फौंडेशनच्या अध्यक्षा सौ. वैदेही सुधीर सावंत यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कसबा-संगमेश्वर येथील सरदेसाई वाड्याची पाहणी केली असता वास्तूची झालेली दुरवस्था, पडझड आणि होत असलेले दुर्लक्ष निदर्शनास आले. उपलब्ध ऐतिहासिक नोंदीनुसार, फेब्रुवारी १६८९ च्या सुमारास छत्रपती संभाजी महाराज विशाळगडाहून रायगडकडे जात असताना कसबा-संगमेश्वर येथे मुक्कामी होते. याच परिसरात मोगल सेनापती मुकर्रब खानाच्या सैन्याने त्यांना पकडले होते. त्यामुळे सरदेसाई वाड्याला छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाशी जोडलेले महत्त्वपूर्ण स्मृतिस्थळ म्हणून जतन करण्याची आवश्यकता असल्याचे सौ. सावंत यांनी निवेदनात नमूद केले आहे.
सरदेसाई वाड्याची तातडीने शासकीय पुरातत्त्वीय पाहणी करून वास्तूस्थितीचा पंचनामा करण्यात यावा, तसेच वैज्ञानिक पद्धतीने वास्तूचे संवर्धन व जतन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. वाड्याचे उपलब्ध अवशेष सुरक्षित करून पुढील पडझड रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी आहे. याशिवाय पुरातत्त्व विभाग, इतिहास संशोधक आणि वास्तुविशारदांच्या समितीमार्फत संवर्धनाचा आराखडा तयार करण्यात यावा. छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाची अधिकृत माहिती देणारे माहितीफलक उभारून या ठिकाणी स्मृतिस्थळ विकसित करावे, असे निवेदनात म्हटले आहे.
कसबा-संगमेश्वरचा हा ऐतिहासिक वारसा पर्यटन आणि इतिहास अभ्यासाच्या दृष्टीने विकसित केल्यास परिसराला चालना मिळण्याबरोबरच स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे या वारशाच्या संवर्धनासाठी कोणत्या विभागामार्फत, किती कालावधीत आणि कोणत्या निधीतून कार्यवाही केली जाणार आहे, याची लेखी माहिती देण्यात यावी, अशी मागणीही सौ. सावंत यांनी केली आहे.
“स्वराज्याच्या इतिहासाचे स्मरण केवळ जयंती आणि घोषणांमध्ये न राहता ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनातूनही झाले पाहिजे. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीशी निगडित या वास्तूची आणखी पडझड होण्याची वाट न पाहता तातडीने कार्यवाही करावी,” असे सौ. वैदेही सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.


