(रत्नागिरी )
रत्नागिरी तालुक्यातील तोणदे येथे प्रसिद्ध आंबा व्यापारी रूपेश नागवेकर यांनी राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकले नसून, या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
रूपेश नागवेकर हे रत्नागिरीतील हापूस आंबा व्यापार क्षेत्रातील परिचित नाव होते. आंबा व्यापारात त्यांनी आपला ठसा उमटवला होता. तसेच ते ‘हापूस रिसॉर्ट’शी संबंधित नागवेकर कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य होते. स्थानिक स्तरावर एक यशस्वी, सक्रिय आणि मनमिळावू व्यापारी म्हणून त्यांची ओळख होती.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुले आणि भाऊ असा परिवार आहे. या अचानक घडलेल्या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईक, मित्रपरिवार आणि व्यापारी वर्गात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलीस तपासानंतरच याबाबत अधिक माहिती स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे तोणदे गावासह संपूर्ण रत्नागिरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

