(नवी दिल्ली / वृत्तसंस्था)
गणेशोत्सवानंतर दसऱ्यासह सणासुदीच्या काळात इलेक्ट्रॉनिक उपकरणांची खरेदी वाढत असताना यंदा ग्राहकांना मात्र वाढत्या किमतींचा सामना करावा लागणार आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणे तयार करणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांनी १ ऑक्टोबरपासून आपल्या उत्पादनांच्या किमती वाढविण्याचा निर्णय घेतला असून, काही उत्पादनांच्या किमती ५ ते ८ टक्क्यांनी वाढणार आहेत.
ब्ल्यू स्टार, गोदरेज अप्लाईन्स, हायर, डायकिन आणि सुपर प्लास्ट्रोनिक्स या कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांच्या किमती सुमारे ४ ते १० टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पॅनासॉनिक कंपनीने मात्र दरवाढीनंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा आढावा घेत असल्याचे म्हटले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एलडी आणि बॉश होम कम्फर्ट कंपनीने एसीच्या किमती सुमारे ५ टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
एसीच्या किमतीत ५ ते ८ टक्क्यांनी वाढ होणार आहे. याशिवाय काही कंपन्या वॉशिंग मशिन, फ्रीज आणि एलईडी टीव्हीच्या किमती ३ ते ४ टक्क्यांनी वाढविणार आहेत. काही कंपन्या मात्र किमती वाढविण्याबाबतच्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत. सणासुदीच्या काळात इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या किमती वाढल्याचा परिणाम मागणीवर होण्याची भीती काही कंपन्यांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे, काही कंपन्यांच्या मते डीलर्स आणि वितरकांवर याचा मर्यादित परिणाम होऊ शकतो, कारण दुकानांमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा स्टॉक यापूर्वीच उपलब्ध आहे.
ब्ल्यू स्टारचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) बी थैयागाराजन यांनी सांगितले की, एसी आणि डीप फ्रीजर्सच्या किमती यापूर्वीच ५ ते ८ टक्क्यांनी वाढल्या आहेत. कमोडिटीच्या दरवाढीचा हा परिणाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तांबे, स्टील आणि क्रूड डेरिव्हेटिव्हजसारख्या घटकांच्या किमती वाढल्यामुळे उत्पादनांच्या किमती वाढवाव्या लागत असल्याचा कंपन्यांचा दावा आहे.
याशिवाय पश्चिम आशियातील युद्धामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर विदेशी चलनाचा विनिमय दर अस्थिर असल्याचेही कंपन्यांकडून सांगण्यात आले आहे. या कारणांमुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या किमती वाढविण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, एकाच वर्षात इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या किमतीत ही तिसऱ्यांदा वाढ झाली आहे.


