(वॉशिंग्टन / वृत्तसंस्था)
आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआयच्या वाढत्या वापरासोबतच त्याच्या गैरवापराबाबतही जगभरात चिंता व्यक्त होत आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी एआयच्या संभाव्य धोक्यांबाबत गंभीर इशारा देताना, अत्याधुनिक एआयचा चुकीच्या हेतूने वापर झाल्यास अत्यंत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी घडवून आणणाऱ्या घटना घडू शकतात, असे म्हटले आहे.
एका मुलाखतीदरम्यान गेट्स यांना एआयच्या संभाव्य धोक्यांविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी एआय कंपन्यांकडून स्वतः तयार करण्यात आलेले सुरक्षा नियम पुरेसे नसल्याचे त्यांनी मत व्यक्त केले. एआयची क्षमता जसजशी वाढत जाईल, तसतसे त्याच्या विकासावर आणि वापरावर स्पष्ट कायदेशीर नियम, प्रभावी सुरक्षा उपाय तसेच देखरेख आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. एआयच्या नियमनासाठी कायदे करण्याची गरज असून, सरकार, कायदा अंमलबजावणी यंत्रणा आणि राजकीय नेतृत्वाने या प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक असल्याचेही गेट्स यांनी नमूद केले.
गेट्स यांच्या मते, एआय इतके शक्तिशाली तंत्रज्ञान बनले आहे की, त्याचा गैरवापर झाल्यास निर्माण होणाऱ्या घटनांमध्ये १ अब्ज लोकांपर्यंत मृत्यू होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. मात्र, एआयमुळे निश्चितपणे १ अब्ज लोकांचा मृत्यू होईल, असा दावा त्यांनी केलेला नाही. अत्यंत प्रगत एआय साधने आणि त्यांचा गैरवापर करणाऱ्या व्यक्ती किंवा गट यांचा संगम झाल्यास निर्माण होऊ शकणाऱ्या संभाव्य परिस्थितीबाबत त्यांनी हा इशारा दिला आहे.
एआयच्या गैरवापराचा धोका हा गेट्स यांच्या चिंतेचा प्रमुख मुद्दा आहे. अत्याधुनिक एआय टूल्स चुकीच्या हेतूने वापरणाऱ्या व्यक्ती किंवा संघटनांच्या हाती गेल्यास मोठ्या प्रमाणावर नुकसान घडवून आणण्याची त्यांची क्षमता वाढू शकते, असे त्यांचे म्हणणे आहे. एआयचा वापर सायबर हल्ले, फसवणूक, चुकीची माहिती, डीपफेक तसेच इतर हानिकारक कामांसाठी होण्याची शक्यता यापूर्वीही तज्ज्ञ आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्तींनी व्यक्त केली आहे. त्यामुळे एआयची सुरक्षा केवळ कंपन्यांच्या अंतर्गत धोरणांवर अवलंबून ठेवणे योग्य ठरणार नाही, असे गेट्स यांचे मत आहे. सुरक्षा आणि मॉनिटरिंगसाठी बंधनकारक नियम असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, एआयच्या वाढत्या क्षमतेमुळे चिंता व्यक्त करणारे गेट्स हे तंत्रज्ञान क्षेत्रातील एकमेव व्यक्ती नाहीत. एॅट्रोपिकचे सीईओ डारियो अमोडेई यांनीही सप्टेंबर २०२६मध्ये एआय मॉडेल्सच्या क्षमतेत होणाऱ्या वेगवान वाढीचा वेग काही प्रमाणात कमी करण्याचे आवाहन केले आहे. एआयची क्षमता ज्या वेगाने वाढत आहे, त्या तुलनेत सुरक्षा व्यवस्था आणि नियंत्रणाची साधने मागे पडू शकतात, असे अमोडेई यांचे मत आहे. त्यांनी तृतीय-पक्षाकडून एआय मॉडेल्सचे सुरक्षा मूल्यांकन, उद्योगातील समन्वय तसेच सरकारांशी आंतरराष्ट्रीय सहकार्य यांसारख्या उपायांची मागणी केली आहे.


