(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील आजिवली येथे गुरे चारण्यासाठी गेलेल्या एका इसमाचा महावितरण कंपनीची वीजवाहिनी जमिनीवर पडलेली असताना तिचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. जयवंत राणे (वय ४९ वर्षे, रा. आजिवली) असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास घडली.
जयवंत राणे हे गुरे चारण्यासाठी रानात गेले असता तेथे जमिनीवर पडलेल्या विजेच्या वायरचा त्यांना धक्का लागला. या घटनेची माहिती मिळताच आजिवलीचे सरपंच संजय राणे व ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तत्काळ जयवंत राणे यांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सायंकाळी ६.३०च्या सुमारास डॉक्टर तांदळे यांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर आजिवलीचे सरपंच संजय राणे यांनी पाचल येथील महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. मात्र, रात्री ९.४५ वाजेपर्यंत पाचल किंवा राजापूर येथील महावितरण कार्यालयातून एकही अधिकारी घटनास्थळी पोहोचला नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये महावितरण कंपनीच्या कामकाजाबाबत पुन्हा एकदा नाराजीचा सूर उमटला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच रायपाटण पोलीस दूरक्षेत्राचे बीट अंमलदार दत्तात्रय बाणे, पोलीस कॉन्स्टेबल रामदास पाटील, श्री. कोळी तसेच राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी घटनास्थळी धाव घेतली.
रात्री ९.४५नंतर महावितरण कंपनी, राजापूरचे कार्यकारी उपअभियंता मंगेश शिरसागर घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेतली. प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, रायपाटण येथे नेण्यास सांगितले आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.


