(गुहागर / वार्ताहर)
गुहागर तालुक्यातील उमराठ कोंडवीवाडी येथे ‘कला संगम’तर्फे आयोजित घरगुती गणेशोत्सव मखर डेकोरेशन स्पर्धा २०२६ यंदा अतिशय चुरशीची झाली. सलग पाचव्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला गणेशभक्त आणि कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध संकल्पना, पारंपरिक कला, सामाजिक संदेश, ऐतिहासिक विषय तसेच आकर्षक मखर सजावटीच्या माध्यमातून सहभागी कलाकारांनी आपली कल्पकता आणि सर्जनशीलता सादर केली.
गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहासोबतच कला, कल्पकता आणि सर्जनशीलतेचा उत्सव म्हणूनही साजरा केला जातो. उमराठ कोंडवीवाडी येथे गेल्या सलग पाच वर्षांपासून ‘कला संगम’ या उपक्रमाच्या माध्यमातून कोंडवीवाडी, उमराठ गाव तसेच गुहागर तालुक्यातील मुलांना आणि कलाकारांना आपल्या कलाकुसरीचे, कल्पकतेचे व सर्जनशीलतेचे प्रदर्शन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे.
यंदाच्या स्पर्धेत अनेक गणेशभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध संकल्पनांवर आधारित सुंदर मखर डेकोरेशन साकारले. यामध्ये काही सजावटींनी विशेष लक्ष वेधून घेतले. स्पर्धेतील प्रथम क्रमांक संदेश पांडुरंग गावणंग यांनी ‘श्री नवलाई देवी सहान’ या संकल्पनेवर साकारलेल्या सजावटीसाठी पटकावला. द्वितीय क्रमांक प्रथमेश रमेश गावणंग आणि प्रमोद बाळू गावणंग यांनी साकारलेल्या ‘शेतकरी बळीराज्याची व्यथा’ या सजावटीला मिळाला. तृतीय क्रमांक उमेश गंगाराम गावणंग यांनी साकारलेल्या ‘कोंडवी वाडी नमन नाट्य मंडळ, साहित्य संघ, मुंबई’ या सजावटीला मिळाला.
उत्तेजनार्थ पारितोषिकांसाठी प्राची कृष्णा गावणंग, सौरभ संतोष धनावडे, साहिल संतोष गावणंग आणि संकेत शंकर गावणंग यांची निवड करण्यात आली. तर दखलपात्र डेकोरेशन म्हणून प्रकाश शिवराम गावणंग, मिलिंद हरिश्चन्द्र गावणंग आणि मुकुंद गोविंद धनावडे यांच्या सजावटींची नोंद घेण्यात आली.
स्पर्धेतील सर्व विजेते, उत्तेजनार्थ पारितोषिकप्राप्त तसेच दखलपात्र डेकोरेशन साकारणाऱ्या सर्व सहभागींचे कला संगमचे आयोजक मंगेश गावणंग, योगेश गावणंग व वैभव धनावडे यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. सहभागी कलाकारांनी दाखवलेली कल्पकता, मेहनत, कलाकुसर आणि गणरायाप्रतीची भक्ती निश्चितच कौतुकास्पद असल्याचे आयोजकांनी सांगितले.
‘कला संगम’चा हा उपक्रम केवळ स्पर्धेपुरता मर्यादित नसून गावातील नव्या पिढीतील कलाकारांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या कलेला व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा त्यामागील उद्देश आहे. आगामी २०२७ मध्ये आणखी नवीन संकल्पना, कल्पना आणि नाविन्यपूर्ण सजावटींसह अधिकाधिक गणेशभक्तांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक मंगेश गावणंग, योगेश गावणंग व वैभव धनावडे यांनी केले.
‘आपल्या कलाकारांच्या कलेला वाव देऊया, कल्पनांना आकार देऊया आणि गणरायाच्या सजावटीतून आपली सर्जनशीलता जगासमोर आणूया,’ असा संदेशही कला संगम उमराठ कोंडवीवाडीच्या आयोजकांनी दिला. या स्पर्धेतील आकर्षक सजावट पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी गर्दी केली होती. उमराठ पंचक्रोशीतील नागरिकांकडून स्पर्धेत सहभागी झालेल्या कलाकारांचे कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे.


