(राजापूर / राजन लाड)
रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे यांच्या हस्ते नुकताच नाटे पोलीस ठाण्याचा सत्कार करण्यात आला होता. उत्कृष्ट गुन्हे उकल, ISO मानांकन, तसेच CCTNS प्रणालीतील जिल्हास्तरीय दुसरा क्रमांक यासारख्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सपोनी प्रमोद वाघ, तसेच CCTNS कामकाजाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अंमलदार सुप्रिया बांदकर यांना प्राप्त झालेल्या गौरवाचा संदर्भ घेत नागरी संरक्षण दल रत्नागिरीच्या जैतापूर व परिसरातील स्वयंसेवकांनी नाटे पोलीस ठाण्याचे हार्दिक अभिनंदन केले.
नाटे पोलीस ठाण्याने अलीकडील दोन्ही गुन्ह्यांची झपाट्याने उकल करत गु.र. क्र. 74/2025 मधील ₹1,47,000 किमतीचा मुद्देमाल पुण्यातून हस्तगत, तसेच गु.र. क्र. 75/2025 मधील घरफोडीचा गुन्हा फक्त 12 तासांत ओपन करून सर्व मुद्देमाल जप्त केला. या उत्कृष्ट तपासाद्वारे नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत नाटे पोलिसांनी आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे.
याच अनुशंगाने नागरी संरक्षण दलाचे स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिकांनी पोलीस दलाचे उत्स्फूर्त अभिनंदन करत त्यांचे मनापासून कौतुक केले. या कार्यक्रमास पत्रकार राजन लाड, जैतापूर ग्रामपंचायतीचे सदस्य सिकंदर करगुटकर, रुपेश करगुटकर, माजी उपसरपंच प्रसाद मांजरेकर, परेश भाटकर, सिमरन मांजरेकर, सानिका लाड, नेहा पालकर, मानसी राऊत, अंकिता मांजरेकर, प्रतिभा मोहिते, कीर्ती पवार, सुरेंद्र ठुकरुल यांच्यासह नागरी संरक्षण दलाचे अनेक स्वयंसेवक उपस्थित होते.
यावेळी सागरी पोलीस ठाणे नाटे चे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस उपनिरीक्षक झगडे, तसेच नाटे पोलीस ठाण्याचे अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. परस्पर संवादाद्वारे पोलिस व नागरिक यांच्या संयुक्त सहभागातून सुरक्षा व्यवस्थेस मजबूत करण्यावर भर देण्यात आला.
कार्यक्रमात पोलीस प्रशासनाच्या सततच्या प्रयत्नांचे आणि तळागाळातील जनजागृतीसाठी नागरी संरक्षण दलाच्या योगदानाचे कौतुक करण्यात आले. प्रभावी तांत्रिक तपास, शिस्तबद्ध कामकाज आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सतत कार्यरत असलेल्या नाटे पोलिसांचे अभिनंदन करत स्वयंसेवकांनी पुढेही सहयोगाची तयारी व्यक्त केली.

