(रत्नागिरी /प्रतिनिधी)
आगामी जनगणना आणि मतदार याद्यांच्या विशेष पडताळणी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत जिल्हा परिषद कर्मचारी तसेच शिक्षकांच्या यंदाच्या सर्वसाधारण बदल्या रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. ग्रामविकास विभागाकडून याबाबतचे लेखी निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले असून, प्रशासनाने तातडीने त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे.
केंद्र सरकारकडून २०२७ च्या जनगणनेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, त्याअंतर्गत महाराष्ट्रातील पहिला टप्पा १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या कालावधीत जिल्ह्यातील हजारो प्रगणक व पर्यवेक्षक घराघरांत जाऊन डिजिटल पद्धतीने माहिती संकलित करणार आहेत. त्याचबरोबर मतदार याद्यांच्या विशेष पुनर्पडताळणी (एसआरआय) मोहिमेची जबाबदारीही प्रशासनावर आहे. या व्यापक आणि मनुष्यबळ-आधारित कामांसाठी आवश्यक कर्मचारी उपलब्ध राहावेत, यासाठी ग्रामविकास विभागाने ‘क’ व ‘ड’ वर्गातील कर्मचारी तसेच सर्व जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांवर तात्पुरती स्थगिती लागू केली आहे. सन २०२६ साठी या संवर्गातील बदल्या प्रक्रिया राबविण्यात येऊ नयेत, असे स्पष्ट निर्देश आदेशात नमूद करण्यात आले आहेत.
दरवर्षी ऑनलाइन पद्धतीने पार पडणाऱ्या शिक्षक बदल्यांची प्रक्रिया यंदा थांबविण्यात आल्याने बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचारी व शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, जनगणना व मतदार पडताळणी ही राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाची जबाबदारी असल्याने प्रशासनाने या निर्णयाचे समर्थन केले आहे.

