(रत्नागिरी / प्रतिनिधी)
निरूळ गावातील दोणी परिसरातील झाडाझुडपांमध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली. अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयोगटातील या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने ही घटना काही दिवसांपूर्वीची असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निरूळ गावातील दोणी परिसरात झाडाझुडपांमध्ये असलेल्या आष्ट्याच्या झाडाच्या आडव्या फांदीला पिवळ्या रंगाची नायलॉनची दोरी बांधून एका व्यक्तीने गळफास घेतल्याचे आढळून आले. २५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजण्यापूर्वी ही बाब निदर्शनास आली. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे असून त्याचे नाव, गाव व इतर ओळख अद्याप समोर आलेली नाही. या घटनेची माहिती मिळताच पूर्णगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली.
या प्रकरणी आकस्मिक मृत्यू क्रमांक ३३/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली आहे. मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून, त्याच्या मृत्यूमागील नेमके कारणही तपासले जात आहे.


