(ठाणे / वृत्तसंस्था)
ठाणे शहरात रात्रीच्या वेळी कर्तव्य बजावत गस्त घालणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाचा धक्काबुक्कीत डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस उपनिरीक्षक (PSI) किसन भोईर यांचा या घटनेत जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी राजू वाल्मिकी याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, PSI किसन भोईर हे ठाणे शहरातील परिसरात रात्रीच्या सुमारास नेहमीप्रमाणे गस्त घालत होते. गस्तीदरम्यान परिसरातील काही दारूची दुकाने रात्री उशिरापर्यंत बेकायदेशीरपणे सुरू असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली. या माहितीची दखल घेत भोईर संबंधित ठिकाणी कारवाईसाठी पोहोचले.
तेथे राजू वाल्मिकी हा रस्त्यावरच उघडपणे मद्यपान करत बसल्याचे पोलिसांना आढळले. सार्वजनिक ठिकाणी दारू पित असल्याने PSI किसन भोईर यांनी त्याला हटकले आणि पोलीस व्हॅनमध्ये बसण्यास सांगितले. मात्र, याच कारणावरून राजू वाल्मिकी आणि PSI भोईर यांच्यात बाचाबाची झाली.
बाचाबाची सुरू असतानाच संतप्त झालेल्या राजू वाल्मिकीने PSI किसन भोईर यांना जोरात धक्का दिला. धक्का इतका तीव्र होता की भोईर यांचा तोल गेला आणि ते जमिनीवर डोक्याने आदळले. डोक्याला तीव्र मार लागल्याने किसन भोईर यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत राजू वाल्मिकी याला ताब्यात घेत अटक केली. या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. रात्रीच्या वेळी कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचा धक्काबुक्कीत मृत्यू झाल्याने या घटनेने ठाणे शहरात खळबळ उडाली आहे.


