(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरासह उपनगरांमध्ये फटाका सायलेन्सर लावून भरधाव वेगाने धावणाऱ्या दुचाकींच्या कर्णकर्कश आवाजाचा त्रास आता पोलिसांच्या रडारवर आला आहे. केवळ ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न न राहता रात्रीच्या शांततेचा भंग करणाऱ्या या दुचाकींविरोधात जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे, अशा दुचाकींवर कारवाई करण्याबरोबरच फटाका सायलेन्सर विकणाऱ्या अथवा बसवून देणाऱ्या विक्रेत्यांवरही कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
रत्नागिरी शहर आणि परिसरातील प्रमुख रस्त्यांवर फटाका सायलेन्सर लावलेल्या दुचाकींचा वावर वाढला आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या या दुचाकींच्या अचानक होणाऱ्या मोठ्या आवाजाने विशेषतः ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि लहान मुलांना त्रास सहन करावा लागत आहे. महाविद्यालयीन युवक आणि तरुणांबरोबरच काही अल्पवयीन मुलांकडूनही अशा दुचाकींचा वापर होत असल्याचे चित्र आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्याची तातडीने दखल घेत बगाटे यांनी शहर अथवा परिसरात विशेष ड्राइव्ह घेऊन दुचाकींच्या सायलेन्सरची तपासणी करण्याचे आदेश वाहतूक शाखेला दिले. नियमबाह्य सायलेन्सर आढळल्यास वाहन जप्त करण्यासह चालकावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
फटाका सायलेन्सर लावलेल्या दुचाकीस्वारांवर कारवाई करून प्रश्न सुटणार नाही, हे लक्षात घेत अशा प्रकारचे सायलेन्सर विकणाऱ्या आणि बसवून देणाऱ्यांवरही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता आवाजाचा ‘थरार’ निर्माण करणाऱ्या दुचाकीस्वारांसोबतच त्यांना असे सायलेन्सर उपलब्ध करून देणाऱ्यांवरही पोलिसांची नजर राहणार आहे.
‘वेळ साधून’ रस्त्यावर सुसाट
शहरातील काही भागांत पोलिसांच्या नियमित कामकाजाच्या वेळांचा अंदाज घेत काही दुचाकीस्वार भरधाव वेगाने दुचाकी पळवत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. विशेषतः साळवी स्टॉप ते मारुती मंदिर या मार्गावर दुपारनंतर तसेच रात्री अशा दुचाकींचा वावर होत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे नियमित कारवाईसोबतच अनपेक्षित वेळेत तपासणी मोहीम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.
आदेशाची अंमलबजावणी किती प्रभावी?
फटाका सायलेन्सरविरोधात आदेश स्पष्ट असले तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते, हे महत्त्वाचे ठरणार आहे. दुचाकी जप्ती, दंडात्मक कारवाई आणि सायलेन्सर विक्रेत्यांवर कारवाई यामुळे शहरातील कर्णकर्कश आवाजाला कितपत आळा बसतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


