(पुणे )
ग्रामीण भागातील बेरोजगारी आणि शेतीतील घटती नफा क्षमता लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने ‘कृषी मित्र’ ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे सुशिक्षित ग्रामीण तरुणांना रोजगार देतानाच शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवण्याचा सरकारचा उद्देश आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत या योजनेची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, कृषी विभाग थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांना आधुनिक शेतीसाठी मार्गदर्शन आणि तांत्रिक मदत उपलब्ध करून देणार आहे
11,587 पदांवर भरती
या योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यभरात 11,587 ‘कृषी मित्र’ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. ही भरती जिल्हास्तरावर केली जाईल आणि 1 जून 2026 पासून योजना सुरू करण्याचे नियोजन आहे. निवड झालेल्या उमेदवारांना वर्षाला 18,000 रुपये मानधन दिले जाणार आहे. हे मानधन दर तीन महिन्यांनी टप्प्याटप्प्याने वितरित केले जाईल.
पात्रता निकष
‘कृषी मित्र’ योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:
- वय 40 वर्षांपेक्षा कमी असावे
- किमान माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण असावे
- संवाद कौशल्य चांगले असावे
- सोशल मीडियाचा वापर करता येणे आवश्यक
- समाजकार्याची आवड असणे फायदेशीर
महिलांसाठी 30% आरक्षण
या योजनेत महिलांनाही समान संधी देण्यात आली असून एकूण पदांपैकी 30% जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण महिलांना आर्थिक स्वावलंबनाची संधी मिळणार आहे.
शेतीत तंत्रज्ञानाचा वापर वाढणार
‘कृषी मित्र’ योजना ही केवळ रोजगार निर्मितीपुरती मर्यादित नसून शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धती, तंत्रज्ञान आणि सरकारी योजनांची माहिती देण्याचे महत्त्वाचे काम या माध्यमातून केले जाणार आहे. ग्रामीण भागातील तरुणांसाठी ही योजना मोठी संधी ठरणार असून शेती अधिक फायदेशीर करण्यासाठी आणि रोजगार निर्माण करण्यासाठी सरकारचा हा महत्त्वाचा उपक्रम मानला जात आहे.

