(गणपतीपुळे / वैभव पवार)
कायदा व सुव्यवस्था, नागरिकांची सुरक्षितता, सायबर गुन्हे, अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, महिला व बालकांची सुरक्षा, वाहतूक नियम आणि सामाजिक सलोखा याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी जयगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभांच्या माध्यमातून जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत नुकताच मालगुंड ग्रामपंचायतीमध्ये सायबर जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जयगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले.
रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी नागरिकांमध्ये सातत्याने जागरूकता निर्माण करण्यासाठी जनजागृतीचा उपक्रम थेट गावागावांतील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमांना ‘मिशन प्रबोधन’ या एकत्रित व्यासपीठाची जोड देण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या संकल्पनेतून हा नागरिकाभिमुख उपक्रम हाती घेण्यात आला असून, अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या सहकार्याने ग्रामसभा, शाळा-महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणे तसेच शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांशी थेट संवाद साधला जाणार आहे.
मालगुंड ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या कार्यक्रमात नागरिकांच्या समस्या, अडचणी, सुरक्षिततेशी संबंधित बाबी तसेच स्थानिक पातळीवरील कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न जाणून घेण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी नागरिकांना कायदेशीर हक्क व कर्तव्ये, सायबर सुरक्षा, ऑनलाइन आर्थिक फसवणूक, अंमली पदार्थांविरोधातील जनजागृती, महिला व बालकांची सुरक्षा, वाहतूक नियम, ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता आणि सामाजिक सलोखा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
‘मिशन प्रबोधन’च्या माध्यमातून पोलिसांच्या विविध नागरी उपक्रमांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. यामध्ये आपत्कालीन मदतीसाठी डायल ११२, सायबर फसवणुकीसाठी १९३०, अंमली पदार्थांविरोधातील ‘मिशन रायझिंग फ्लॉवर्स’ व ‘मिशन फिनिक्स’, गुन्हे तपासातील संवादासाठी ‘मिशन प्रगती’, ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मिशन जीवन’, नागरिकांच्या तक्रारींसाठी ‘मिशन प्रतिसाद’, गतिमान पोलीस सेवेसाठी ‘मिशन रॅपिड’ आणि वाहतूक सुरक्षिततेसाठी ‘मिशन TAPE SAFE’ यांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली. जनजागृती अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डिजिटल माध्यमे, सोशल मीडिया, व्हिडिओ, ॲनिमेशन, माहितीपट आणि संवादात्मक डिजिटल कंटेंटचा वापर केला जाणार आहे.
मालगुंड ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या या सायबर जनजागृती कार्यक्रमाला रत्नागिरी पंचायत समितीच्या सदस्या पूर्वा दुर्गवळी, मालगुंड सरपंच श्वेता खेऊर, उपसरपंच स्मिता दुर्गवळी, ग्रामसेवक प्रक्षाळे, लिपिक मिलिंद खेऊर, ग्रामपंचायत सदस्या शुभदा मुळ्ये, शिल्पा पवार, सदस्य नितीन दुर्गवळी, संतोष चौगुले, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष विलास राणे यांच्यासह मालगुंडमधील महसूल गावांचे पोलीस पाटील, विविध समित्यांचे सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


