(नाशिक / प्रतिनिधी)
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे उपव्यवस्थापक गुरुपुत्र श्री नितीनभाऊ मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अमेरिकेच्या सिएटल आणि लॉस एंजलिस शहरांमध्ये ७ व ८ नोव्हेंबर रोजी विश्वशांती महोत्सव अपूर्व उत्साहात पार पडला.
सिएटलमध्ये बालसंस्कार विभागातर्फे नाटिका आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे अतिशय सुरेख सादरीकरण करण्यात आले. सर्वांनी बाल सेवेकऱ्यांचे कौतुक केले. यावेळी साई भक्त वामशी शेट्टी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते तर लॉस एंजलिस (कॅलिफोर्निया) येथील कार्यक्रमात बाल संस्कार विभागाच्या मुलांनी विविध स्पर्धा, उपक्रम आयोजित केले होते. त्यामध्ये प्रामुख्याने आंतरिक शांती ते विश्वशांती ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील स्पर्धकांचे सादरीकरण पाहून उपस्थित श्रोत्यांनी त्यांचे कौतुक केले. तसेच श्रीयंत्र पूजन, स्वामी पालखी सोहळा, स्वामी पादुका दर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम हे सारे उपक्रम मोठ्या भक्तीभावाने करण्यात आले. कार्यक्रमानंतर सर्वांनी आनंदाने महाप्रसादाचा लाभ घेतला.
विश्वशांतीसाठी अध्यात्म गरजेचे: नितीनभाऊ मोरे
सिएटल आणि लॉस एंजलिस येथील कार्यक्रमात गुरुपुत्र श्री. नितीनभाऊ मोरे यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.उपस्थित सेवेकऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी विश्वशांतीसाठी अध्यात्मशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन केले. येणारा काळ कठीण असला तरी सेवेकर्यांनी आपल्या नित्यसेवेत खंड पडू देऊ नये. त्याचप्रमाणे मुलांवर संस्कार होणे ही काळाची गरज आहे. आजच्या पिढीला मोबाईलचे व्यसन लागले असून पालकांनी जागरूक राहून मुलांवर चांगले संस्कार रुजवावेत असे आवाहन त्यांनी केले. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी सेवामार्गाच्या अठरा विभागांची माहिती दिली.
कॅलिफोर्निया येथील महोत्सवाला मान्यवरांची उपस्थिती
या महोत्सवाला “वूमन ऑफ द इयर २०१२”च्या मानकरी आणि एसएमएपी-एलएच्या अध्यक्षा सौ.अपर्णा हांडे, युनायटेड इंडियन असोसिएशन्स ऑफ सदर्न कॅलिफोर्निया या संघटनेचे चेअरमन श्री केवळ कंदा, न्यूरोलॉजिस्ट डॉ. श्रीकृष्ण वैद्य व डॉ. रोहिणी जोशी, इर्विन येथील श्रीनाथजी हवेली मंदिरचे अध्यक्ष श्री. हितेश हंशलिया, तसेच इर्विन हिंदू मंदिरचे श्री. सुरेश लोहिया आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बालसंस्कार वर्गांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बाल सेवेकर्यांना गुरुपुत्र श्री. नितीनभाऊ मोरे यांच्या हस्ते प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.मागील वर्षी आध्यात्मिक मार्गदर्शन घेतलेल्या अनेक सेवेकर्यांनी पुन्हा आनंदाने उपस्थित राहून स्वामींच्या कृपेने आमचे प्रश्न सुटले, समस्या मार्गी लागल्या, अडचणी दूर झाल्या असे अनुभव मांडले. गुरुपुत्र श्री नितीनभाऊ मोरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमांचे सुंदर आयोजन करण्यात आले आणि छान आध्यात्मिक अनुभूती मिळाली याबद्दल सिएटल आणि लॉस एंजलिस येथील सेवेकर्यांनी आयोजकांचे आभार मानले.

