(मुंबई / वृत्तसंस्था)
15 ऑक्टोबरपासून यूपीआय (UPI) व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क लागू होण्याच्या चर्चेदरम्यान भारतीय स्टेट बँकेने (SBI) आपल्या काही खातेदारांसाठी रोख रक्कम काढण्याच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. हे नवे नियम 1 ऑक्टोबर 2026 पासून लागू होणार असून, Basic Savings Bank Deposit (BSBD) म्हणजेच बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट खात्यांशी संबंधित आहेत. मात्र, एसबीआयने स्पष्ट केले आहे की हे बदल बँकेच्या सर्व खातेदारांना लागू होणार नाहीत.
नव्या नियमानुसार, BSBD खातेदारांना महिन्यातून एकूण 4 वेळा एटीएम किंवा बँकेच्या शाखेतून रोख रक्कम काढणे मोफत राहणार आहे. या चार मोफत व्यवहारांची मर्यादा पूर्ण झाल्यानंतर करण्यात येणाऱ्या प्रत्येक अतिरिक्त रोख व्यवहारासाठी 15 रुपये शुल्क आकारले जाईल. या शुल्कासोबत लागू असलेला जीएसटी (GST) देखील ग्राहकाला भरावा लागेल.
1 ऑक्टोबर 2026 नंतरही BSBD खातेदारांसाठी दरमहा 4 मोफत रोख व्यवहारांची सुविधा कायम राहणार असल्याची माहिती भारतीय स्टेट बँकेने दिली आहे. त्यामुळे निर्धारित मोफत मर्यादेपर्यंत पैसे काढणाऱ्या ग्राहकांवर या बदलाचा अतिरिक्त शुल्काच्या स्वरूपात परिणाम होणार नाही.
दरम्यान, या बदलांचा डिजिटल व्यवहारांवर कोणताही परिणाम होणार नाही. ग्राहक यूपीआय (UPI), नेट बँकिंग किंवा डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून पूर्वीप्रमाणे कितीही वेळा मोफत व्यवहार करू शकतील. या डिजिटल व्यवहारांवर कोणतीही मर्यादा किंवा अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.
एसबीआयने आधार सक्षम पेमेंट सिस्टीम म्हणजेच AePS (Aadhaar Enabled Payment System) व्यवहारांच्या नियमांमध्येही बदल केला आहे. यापूर्वी AePS द्वारे करण्यात येणारे कॅश व्यवहार डिजिटल व्यवहार म्हणून ग्राह्य धरले जात असल्याने ते 4 मोफत रोख व्यवहारांच्या मर्यादेत मोजले जात नव्हते. आता मात्र ही सूट काढून घेण्यात आली आहे. त्यामुळे AePS द्वारे काढलेली रोख रक्कमही BSBD खात्यासाठी लागू असलेल्या महिन्यातील 4 मोफत व्यवहारांच्या मर्यादेत मोजली जाणार आहे.


