(नवी दिल्ली)
राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करताना अनेक अपघात केवळ वाहनचालकाच्या थकव्यामुळे किंवा झोपेच्या अभावामुळे घडत असल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने वाहनचालकांसाठी ‘अपना घर’ विश्रांती केंद्र योजना ही एक महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे. ‘अपना घर’ सुविधेचा लाभ घेण्यासाठी चालक मोबाईल अॅपद्वारे ऑनलाइन बुकिंग किंवा थेट ‘अपना घर’ केंद्रावर जाऊन बुकिंग करू शकतात.
योजनेचा उद्देश
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेचा उद्देश महामार्गांवर प्रवास करणाऱ्या व्यावसायिक वाहनचालकांना स्वच्छ, सुरक्षित व परवडणाऱ्या दरात विश्रांतीची जागा उपलब्ध करून देणे आहे. त्यामुळे चालकांची कामाची स्थिती सुधारेल आणि अपघातांचे प्रमाणही लक्षणीय घटेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
‘अपना घर’ मध्ये कोणकोणत्या सुविधा?
सध्या देशभरात ३५० ठिकाणी ‘अपना घर’ केंद्रे कार्यरत असून, त्यामध्ये ४,४३१ बेड्स उपलब्ध आहेत. यामध्ये चालकांसाठी खालील सुविधा पुरवण्यात येतात: वातानुकूलित (एसी) खोल्या, आरामदायी बेड, स्वच्छ शौचालय व बाथरूम, जेवण व स्वयंपाकाची जागा, थंड व गरम पाण्याची व्यवस्था, प्रशस्त पार्किंग. या केंद्रांमध्ये वाहनचालकांना फक्त ₹११२ मध्ये ८ तासांसाठी विश्रांतीची सुविधा दिली जाते. विशेष बाब म्हणजे, जर चालकाने त्यांच्या ट्रकमध्ये ५० लिटर किंवा त्याहून अधिक डिझेल भरले असेल, तर ही सुविधा पूर्णपणे मोफत दिली जाईल.
केंद्रीय मंत्र्यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे, महामार्गांवरील बहुतेक अपघात हे थकवा आणि पुरेशी झोप न मिळाल्यामुळे होतात. ‘अपना घर’ योजना केवळ एक सुविधा नाही, तर एक मानवीदृष्टिकोनातून घेतलेलं महत्त्वपूर्ण पाऊल आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणाऱ्या या चालकांना रस्त्याच्या कडेला झोपावे लागणार नाही. ‘अपना घर’ ही योजना केवळ वाहनचालकांसाठीच नव्हे, तर संपूर्ण महामार्ग सुरक्षेसाठी महत्त्वाची ठरणार आहे. रस्त्यावरील थकवलेले चालक आता सुस्थितीत आराम करून पुन्हा प्रवासासाठी सज्ज होऊ शकतील, हेच या योजनेचं उद्धिष्ठ आहे.