(चंद्रपूर)
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेत यश मिळवून प्रशासकीय अधिकारीपदाची स्वप्ने साकार करणाऱ्या आरती भास्कर जीवने यांचा नव्या पदावर रुजू होण्यासाठी जात असतानाच समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात मृत्यू झाला. या दुर्घटनेत त्यांचे पती, मुलगी तसेच सासू-सासरे अशा एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
मृतांमध्ये प्रशासकीय अधिकारी आरती भास्कर जीवने, त्यांचे पती व अभियंता भास्कर जीवने, १२ वर्षीय कन्या तृषा, सासू लता जीवने आणि सासरे महादेव जीवने यांचा समावेश आहे.
कष्ट, जिद्द आणि चिकाटीने मिळविले MPSC मधील यश
आरती जीवने या चंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समितीत विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. शासकीय सेवेत काम करत असतानाच त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला. मागील तीन ते चार वर्षे त्यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळला. दिवसभर शासकीय जबाबदाऱ्या पार पाडत रात्री अभ्यास करण्याच्या जिद्दीमुळे त्यांनी MPSC परीक्षेत यश मिळवत आरोग्य विभागात प्रशासकीय अधिकारी म्हणून निवड मिळवली.
२४ जून रोजी जिल्हा परिषद प्रशासनाने त्यांना कार्यमुक्त केले, तर २५ जून रोजी त्यांनी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रशासकीय अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. सलग सुट्ट्यांमुळे त्या चंद्रपूरला परतल्या होत्या.
नव्या जबाबदारीसाठी निघालेला प्रवास ठरला अखेरचा
सोमवारपासून नियमित सेवेत रुजू होण्यासाठी आवश्यक सामानासह त्या रविवारी सकाळी पती, मुलगी आणि सासू-सासऱ्यांसह कारने अकोल्याकडे रवाना झाल्या होत्या. मात्र, धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावर त्यांच्या कारची उभ्या कंटेनरला भीषण धडक बसली. अपघात इतका भीषण होता की, पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला.
IIT खडगपूरचे अभियंता होते पती
आरती जीवने यांचे पती भास्कर जीवने हे IIT खडगपूर येथून मायनिंग इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेले अभियंता होते. ओडिशामध्ये काही वर्षे सेवा केल्यानंतर त्यांची वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (वेकोलि) च्या नागपूर मुख्यालयात नियुक्ती झाली होती. अवघ्या पंधरा दिवसांपूर्वीच त्यांनी चंद्रपूरच्या भटाळी क्षेत्रात वरिष्ठ अभियंता म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांचे वडील महादेव जीवने हे वेकोलिचे सेवानिवृत्त कर्मचारी होते.
‘मी नक्की येईन’… पण नियतीनेच साथ सोडली
आरती जीवने यांच्या यशाबद्दल पंचायत समितीतील सहकाऱ्यांनी त्यांच्या सत्कार व निरोप समारंभाचे नियोजन केले होते. “मी नक्की येईन,” असे त्यांनी सहकाऱ्यांना सांगितले होते. मात्र, नियतीने त्यांना त्या समारंभापर्यंत पोहोचू दिले नाही. सहकाऱ्यांचा निरोप स्वीकारण्यापूर्वीच त्यांनी या जगालाच कायमचा निरोप दिला.
अपघाताची माहिती चंद्रपूरमध्ये पोहोचताच बाबूपेठ येथील त्यांच्या निवासस्थानी आणि तुकूम परिसरातील बियाणीनगर येथील घरासमोर नातेवाईक, मित्रपरिवार आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली. धामणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाचही मृतदेह आणल्यानंतर नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.
आरती जीवने यांचा संघर्षमय प्रवास ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी ठरला होता. तर भास्कर जीवने यांनी उच्च शिक्षण आणि गुणवत्तेच्या बळावर अभियांत्रिकी क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती.
समृद्धी महामार्गावरील या भीषण अपघाताने केवळ एका कुटुंबातील पाच जीव हिरावले नाहीत, तर अनेक स्वप्ने, आशा आणि उज्ज्वल भविष्य एका क्षणात संपवले. नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी निघालेला प्रवास अखेर शोकांतिकेत बदलला आणि चंद्रपूरच्या इतिहासात कायमची वेदनादायी नोंद करून गेला.

