(संगमेश्वर /प्रतिनिधी)
तालुक्यातील देवरुख भंडारवाडी येथील अशोक दत्ताराम पुसाळकर (६५) यांचा रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारापूर्वी मृत्यू झाल्याची घटना १९ सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणी देवरुख पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक पुसाळकर हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. आठ दिवसांपूर्वी त्यांच्यावर परकार हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर दोन दिवसांपूर्वी त्यांना घरी आणण्यात आले होते. मात्र, १९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घरी असताना त्यांना अचानक दम लागण्यास सुरुवात झाली. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी देवरुख येथील डॉ. भोजने यांच्याकडे नेले. प्राथमिक तपासणीनंतर अधिक उपचारांची आवश्यकता असल्याने त्यांना रत्नागिरी येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार कुटुंबीयांनी त्यांना खासगी वाहनाने रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर अशोक पुसाळकर यांना १९ सप्टेंबर रोजी दुपारी २.२८ वाजता उपचार सुरू करण्यापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या अकस्मात मृत्यू प्रकरणाची कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर देवरुख पोलिस ठाण्यात संबंधित नोंद करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय तपासणी व पोलिसांच्या पुढील कार्यवाहीअंती स्पष्ट होणार आहे.


